Latest

Nashik News I दुसऱ्याशी चॅटिंग करते म्हणून प्रेयसीचा खून

अंजली राऊत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

प्रेयसी मोबाइलवर दुसऱ्या व्यक्तीसोबत चॅटिंग करीत असल्याच्या संशयातून युवकाने प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयिताने प्रेयसीचा मृतदेह रासबिहारी लिंक रोडजवळील मोकळ्या जागेत टाकला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी खून करणाऱ्यासह त्यास मदत करणाऱ्यास ताब्यात घेतले आहे.

प्रियंका वीरजी वसावे (१९, रा. ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर सागर चिवदास तडवी (२१, रा. मूळ रा. नंदुरबार, हल्ली रा. माउलीनगर, अंबड) असे संशयिताचे नाव आहे. बुधवारी (दि.२३) सकाळी मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. तसेच मृतदेहाची ओळख पटवून तपासास सुरुवात केली. मृतदेह आढळल्यानंतर काही तासांत पोलिसांनी संशयितास पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सागर व प्रियंकाचे प्रेमसंबंध होते. प्रियंका छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिकेचे शिक्षण घेत होती. सोमवारी (दि.२२) प्रियंका सागरच्या अंबड येथील घरी गेली होती. रात्री एक ते दीडच्या सुमारास प्रियंका दुसऱ्या कोणाशी मोबाइल चॅटिंग करीत असल्याचा संशय सागरला आला. या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संतप्त होत सागरने प्रियंकाचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर सागरने त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियंकाचा मृतदेह चारचाकी वाहनातून उड्डाणपूलमार्गे बळीमंदिर येथून रासबिहारी लिंक रोडवरील मीराद्वार लॉन्सशेजारील मोकळ्या जागेत टाकून पळ काढला. बुधवारी (दि.२३) सकाळी दहाच्या सुमारास मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयितांची धरपकड केली. पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कैलास शिंदे व पोलिस नाईक संदीप मालसाने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून संशयित सागर तडवी याच्या अंबड येथील घरी पोहोचले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या खुनाची उकल वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, रोहित केदार, पोलिस हवालदार सागर कुलकर्णी, राजेश सोळसे, अनिल गुंबाडे, दीपक नाईक, पोलिस नाईक नीलेश भोईर, पोलिस अंमलदार घनश्याम महाले आदींच्या पथकाने केली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT