नाना बच्छाव यांना सरबत देताना वारकरी(छाया: हेमंत घोरपडे) 
Latest

Nashik News : नाना बच्छाव यांचे उपोषण मागे, वारकऱ्यांच्या हातून घेतलं सरबत

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा न्यायालयासमोरील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले नाना बच्छाव यांनी शुक्रवारी (दि.३) उपोषण मागे घेतले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घेण्यात आले असले तरी, गेल्या ५२ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार आहे. वारकऱ्यांच्या हातून सरबत घेऊन त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

सरकारला दोन महिन्यांचा अवधी दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (दि.२) आमरण उपोषण मागे घेतले होते. तसेच राज्यातील विविध भागांमधील उपोषण मागे घ्यावेत असे त्यांनी आवाहन केले आहेत. त्यानुसार नाना बच्छाव यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. दरम्यान, उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'सिडको भागातील मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्ताधारी आमदारांच्या सागण्यावरून गुन्हे दाखल करणे दुदैवी आहे. तसेच अधिकारी वाघ यांची तडकाफडकी बदली करणे सुडाचे आहे. अशात या तरुणांवरील गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्याची बदली रद्द केली जावी, अशा मागणीचे निवेदन मराठा महिलांच्या हस्ते त्यांनी पोलीस आयुक्तांना दिल्याचे सांगितले. दरम्यान, वारकरी संप्रदायातील हभप कृष्णा महाराज धोंडगे, हभप पुंडलिक थेटे, रामदास पिंगळे, मराठा उत्कर्ष समितीचे हरिभाऊ शेलार, पैलवान हिरामण वाघ यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी राम खुर्दळ, नितीन डांगे-पाटील, प्रफुल्ल वाघ, शरद लभडे, विकी गायधनी, संजय फडोल, नितीन रोटे-पाटील, योगेश कापसे, मंगला शिंदे, ममता शिंदे, रोहिणी उखाडे, स्वाती आहेर, वंदना पाटील, पूजा धुमाळ, ज्ञानेश्वर कवडे आदी उपस्थित होते.

संभाजी राजे यांचा फोन

उपोषणकर्ते नाना बच्छाव यांना युवराज संभाजीराजे यांनी फोन करून उपोषण सोडा, मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मी प्रयत्न करणार, अशा शब्दात बच्छाव यांची समजूत काढली. यावेळी बच्छाव यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आदेशावरून उपोषण सोडणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT