Latest

नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील ‘हा’ धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो

गणेश सोनवणे

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी

जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभलेला सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांसह इतरही परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आता पावसाळयात हेच निसर्ग सौंदर्य अगदी खुलून गेले आहे. अनेक धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. अशातच दुर्लक्षित पण प्रसिद्धीस येत असलेला सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे.

नाशिक जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची पर्यटनस्थळी झुंबड उडालेली असते. नाशिक ग्रामीण भागात हळूहळू पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे दुर्लक्षित असलेली पर्यटनस्थळे दृष्टीपथात येत आहेत. यातीलच एक डोळ्याचं पारणं फेडणारा धबधबा म्हणजे भिवतास धबधबा होय. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील खोकर विहीर या गावाजवळ हा धबधबा पाहायला मिळतो. भिवतास हे ठिकाण सुरगाणा तालुक्यातील केळावण, खोकरविहीर, अबोडा परिसरात आहे. येथे नदीच्या पाण्यातून कोसळनारा धबधबा असून हा धबधबा सुमारे 1 हजार फुटांवरुन कोसळतो. या धबधब्याची भुरळ अनेकांना असून पावसाळी वातावरणामुळे तो अनेकांना खुनावत आहे.

गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहर व जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्वच लहान मोठी धरणे व तलाव भरून वाहत आहेत. त्याचबरोबर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण व नजीकच्या तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमधमेश्वर, दारणा यासह जवळपास 18 धरणे भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निसर्ग रम्य वातावरणामुळे परिसर आल्हाददायक आणि प्रसन्न वाटतो. येथे गुजरात आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटक भेटी देत असतात. हा धबधबा नाशिकपासून सुमारे 90 किलाेमीटर अंतरावर आहे. सुरगाण्यापासून 50 किलाेमीटरवर हा धबधबा असल्याने पर्यटकांची माेठ्या संख्येने गर्दी हाेते. याठिकाणी ग्रामीण पाेलिसांकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुचना देण्यात आल्या आहेत.

धबधब्याचे रुप आकर्षक

सुरगाणा, पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यातील अनेक धबधबे पाण्याने ओसंडून वाहत आहे. यामध्येच सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधब्याने आकर्षक रूप धारण केल्याने परिसरातील पर्यटकांना त्याची भुरळ पडली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर असलेल्या या धबधब्याचे आकर्षक रूप बघण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली आहे. या धबधब्याला जाण्यासाठी पर्यटकांना ग्रामीण भागातून जावे लागत असून यामध्ये कोणी स्टंटबाजी करू नये, धोक्याचे वळण असल्याने वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा अशा प्रकारच्या सूचना पोलीस यंत्रणाकडून दिल्या जात आहे.

विकासापासून वंचित

भिवंतास धबधब्याजवळ परेटी डोह, हंडाहंडी डोह अतिशय सुंदर असून, दोन्ही बाजूचा परिसर अतिशय नयनरम्य आहे. अलीकडे प्रकाशझोतात आलेला भिवतास धबधबा मात्र विकासापासून आजही वंचित आहे. जर प्रशासन आणि लोकप्रतिनींधीनी या अप्रतिम निर्सगाचा ठेवा असलेल्या धबधब्याकडे लक्ष देऊन सुधारणा केली तर सदर परिसर सुजलाम् सुफलाम् होऊन एक सुंदर असे पर्यटन स्थळ होऊन परिसरातील नागरिकांना रोजगार निर्मिती होईल, अशी मागणी तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT