नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासगी सावकारीविरोधात तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. खासगी सावकारीला आळा घालण्यासाठी पावले उचलत कडक कारवाई करावी, असे आदेश सहकारमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी, पोलीस व सहकार विभागाला दिले. सावकारांविरोधातील तक्रारींची दखल घेत तातडीने चौकशी करावी. त्यात काही तथ्य आढळल्यास सदर सावकारांचे परवाने रद्द करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा सहकारी बँकेतील बड्या थकबाकीदारांकडून सक्तीने कर्जवसूलीचे निर्देशही सावेंनी संबंधित विभागाला दिले.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या ना. सावे यांनी शुक्रवारी (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर सावेंनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकमध्ये महिनाभरात अवैध सावकारीला कंटाळून चार ते ५ व्यक्तींनी आत्महत्या केल्या. याकडे सावे यांचे लक्ष वेधले असता सावकारीच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या असून हा गंभीर विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तक्रारींची तातडीने दखल घेत कारवाई करण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. कलम ८३ व ८८ च्या चौकश्याही वेळेत निकाली काढण्याच्या सूचनाही दिल्याचे सावेंनी सांगितले.
नाशिक जिल्हा बँकेच्या कर्जवसूलीचा मुद्दा जटील आहे. कर्जवसुलीमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सावे यांनी मान्य करताना बँक वाचवण्यासाठी कर्जवसुली आवश्यक आहे. बड्या थकबाकीदारांकडून सक्तीची वसूली करावी. वसुलीवेळी कोणालाही पाठीशी घालू नये, असे सावेंनी निर्देश दिले. बँकेतील छोट्या थकबाकीदारांना बोलवून घेत त्यांना कर्ज भरण्याची विनंती करावी, अशा सूचना सावे यांनी केल्या. बँकेचे सभासद असलेले छोटे शेतकरी व थकबाकीदारांना व्याज्यात काही सवलत देण्यासाठी शासनस्तरावर बैठक घेण्याची ग्वाही सावे यांनी दिली.
हेही वाचा :