Latest

नाशिक : छगन भुजबळ पुन्हा मंत्री, असा आहे राजकीय प्रवास…

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधील आमदारांसह भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत राजभवनात शपथ घेत राजकीय भूकंप घडवून आणला. यामध्ये अजित पवारांनंतर दुसऱ्या क्रमांकावर छगन भुजबळ यांचे नाव होते. राजभवनात अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह इतर आठ आमदारांनी शपथ घेतली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणून काम बघितलेले भुजबळ पुन्हा मंत्री झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाची लहर उमटली आहे.

शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. तेव्हापासून आजतागायत पक्षासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासप्रक्रियेतही ते सातत्याने मोलाची कामगिरी बजावत आले आहेत. १५ ऑक्टोबर १९४७ रोजी नाशिकमध्ये भुजबळ यांचा जन्म झाला. त्यानंतर मुंबईतील व्हीजेटीआयमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका घेतली. तरुणपणीच शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केला. सुरुवातीपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस असल्याने १९७३ मध्ये मुंबई महापालिकेवर निवड झाली. १९७३ ते ८४ महापालिकेत विरोधी पक्षनेता, १९८५ मध्ये मुंबईचे महापौर झाले तसेच १९९१ मध्ये दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर झाले.

विधानसभेवर भुजबळ १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून निवडून गेले. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५ पर्यंत मंत्री तसेच एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अशी त्यांची तेव्हा कारकीर्द होती. राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन मंत्रालयांचा कारभार त्यांनी बघितला. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री, तर २००८ रोजी महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. २००९ मध्ये दुसऱ्यांदा, तर २०१४ मध्ये तिसऱ्यांदा व २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ८ नोव्हेंबर २०१९ पासून राज्याच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT