Latest

नाशिक : करंजवण पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज भूमिपूजन

गणेश सोनवणे

मनमाड : (जि. नाशिक) प्रतिनिधी

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या आणि मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणारी 311 कोटीच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सोमवारी (दि.13) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला औद्योगिक मंत्री उदय सावंत, पालकमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमासाठी शहरातील भगवान ऋषीं वाल्मीकी स्टेडियमवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगावनंतर मनमाड हे मोठे शहर आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सव्वा लाख नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दळणवळणाची सर्व साधने उपलब्ध असतानाही केवळ पाण्याअभावी शहराचा विकास खुंटला आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. कांदे यांनी पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर जनतेने त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी प्रलंबित असलेल्या करंजवण पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करत योजना पदरात पाडून घेतली आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाडला येऊन योजेनेच्या कामाची निविदेची प्रत प्रसिद्ध केली होती. त्यानंतर योजनेच्या कामाची निविदा ठेकेदराने भरल्यानंतर योजनेच्या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. मात्र, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे कामाचे भूमिपूजन होऊ शकले नव्हते. आचारसंहिता संपल्यामुळे मुख्यमंत्री शिंदे या योजनेच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत येणारे औद्योगिक मंत्री उदय सामंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत येणार असल्यामुळे मंत्री सामंत मनमाडसाठी एमआयडीसीची, तर मंत्री सावंत उपजिल्हा रुग्णालयात ट्राॅमा सेंटरची घोषणा करणार आहेत. याव्यतिरिक्त मनमाड, नांदगाव शहरासोबत मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री अनेक योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

सुरक्षेसाठी कडक पोलिस बंदोबस्त

सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी आ. कांदे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, स्टेडियमवर भव्य शेड उभारण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग लागले आहेत. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी कार्यक्रमास्थळी पाहणी करत कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT