Latest

नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर! पंचवीस विद्यार्थी बालंबाल बचावले

गणेश सोनवणे

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

वेळ दुपारी तीनची…ठिकाण दिंडोरी रोड… शाळा सुटल्यानंतर २०-२५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाला अचानक फिट येते…अन‌् बसवरील त्याचे नियंत्रण सुटते…. बस थेट रिक्षाला टक्कर देऊन फुटपाथवरून रस्त्यालगतच्या चार ते पाच दुकानांवर धडकते…अचानक घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावतात… सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडतो… दिंडोरी रोडवरील म्हसरूळ पोलिस चौकीसमोर बुधवारी दुपारी ही घटना घडली. यात रस्त्यालगत उभी असलेली रिक्षा व दुचाकीचे नुकसान झाले. तसेच पादचारी मार्गावर फुल साहित्य विक्रीच्या दुकानाचेही बसखाली आल्याने नुकसान झाले आहे.

दिंडोरी रोडवरून दुपारी तीन ते चार बसेस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन दिंडोरी रोडहून जात असताना त्यापैकी एका बस (एम एच १५ जी एन ४२९१) च्या चालकास अचानक फिट आले. त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभी असलेल्या एका रिक्षास बसने धडक दिली. तसेच बस पादचारी मार्गावरही चढली. यावेळी या ठिकाणी असलेल्या फुल, कटलरी, भाजीपाला अशा चार ते पाच दुकानांवर जाऊन बस थांबली. येथे उभी असलेली दुचाकीदेखील या बस खाली आली. कडक उन्हामुळे या ठिकाणी भाजीपाला, फुल, कटलरी साहित्य विकणारी मंडळी दुकानापासून दूर उभी होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये खासगी शाळेतील लहान वयोगटातील जवळपास वीस ते पंचवीस विद्यार्थी होते. त्यांना सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. या ठिकाणी लागलीच म्हसरूळ येथील ग्रामस्थ तसेच आजू बाजूला रस्त्याहून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले व दुसऱ्या बसने मार्गस्थ केले. तर फिट आलेल्या बस चालकावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

आता तरी प्रशासनाला जाग येईल का?
दिंडोरी रोडवर वाहनांची वर्दळ चांगलीच वाढली आहे. त्यामुळे म्हसरूळ मखमलाबाद लिंक रोड व म्हसरूळ पोलिस चौकी चौफुलीवर होणारे छोटे मोठे अपघात रोखण्यासाठी या दोन्ही ठिकाणी हॅम्प बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र आता तरी प्रशासन जागे होऊन तात्काळ हम्प बसवणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT