नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा – शिवसेना पक्षप्रमुख यांच्या गोरेगाव येथील गटप्रमुखांच्या मेळाव्यातील भाषणानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे हे आयत्या बिळावरील नागोबा आहेत. पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी काय केले? असा सवाल उपस्थित करीत राणेंनी पत्रकार परिषदेतून त्यांच्यावर विखारी टीका केली. यापुढे भाजपचे वरिष्ठ नेते आणि शिंदे गटावर टीका केली तर राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राणे यांनी ठाकरे यांना दिला.
शिवसेना प्रमुख बोलतील तसेच करणारे किती गटप्रमुख आता शिल्लक आहेत? असा सवाल उपस्थित करीत गेल्या अडीच वर्षात ठाकरे यांना गटप्रमुख आठवले नाही, असा टोला राणेंनी लगावला. सत्तेत असताना किती गटप्रमुखांना नोकरी दिली, व्यवसाय टाकून दिला, घर, आजारपणासाठी किती पैसे दिले, किती गटनेत्यांना भेटले, किती निवेदने स्वीकारली अशा प्रश्नांची सरबत्ती राणे यांनी ठाकरे यांना उद्देशून केली.
मुख्यमंत्री असताना केवळ तीन तास मंत्रालयात बसणार्यांनी हिंदुत्वासाठी कुठला त्याग केला? उलट हिंदुत्वाच्या नावावर मिळवल, असा आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा ठाकरेंना का झोंबला? असा सवाल देखील राणे यांनी उपस्थित केला. संजय राउत तुरुंगात असताना देखील सभेत त्यांची खुर्ची ठेवण्यात आली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यासारखा 'ढ' माणून पाहिला नाही, अशी बोचरी टीकाही राणे यांनी केली.
मुंबई महानगर पालिकेत कोण किती टक्के देत होता, हे सर्व माहिती आहे. प्रत्येक कंत्राटावर १५% कमिशन ठाकरेंनी लाटले. मुंबई हे जागतिक किर्तीचे शहर होते. पंरतु, आता काय स्थिती आहे मुंबईची, अशा शब्दात राणे यांनी खंत व्यक्त केली. मातृभूमीसाठी उद्धव ठाकरे यांनी काय केले? मुंबईकर जनतेसाठी त्यांच्या कल्याणासाठी, गरिबांसाठी आणि मुंबईतील दोन लाख भिकार्यांच्या कल्याणासाठी कुठल्या योजना आणल्या, असा सवाल राणेंनी ठाकरे यांना विचारला.
शिवसेना खासदार भावना गवळी यांची बाजू घेत राणे म्हणाले की, बहिणीचे महत्त्व उद्धव ठाकरेंना माहिती नाही. गवळी यांच्यावर भष्ट्राचाराराचे आरोप झाले. त्यानंतर त्यांना क्लिन चीट देण्यात आली. पंरतु, कालच्या सभेत पंतप्रधान आणि गवळी यांच्यासंबंधी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा राणे यांनी समाचार घेतला.हिंमत असेल तर एका महिन्यात महानगर पालिकेसोबत विधानसभेच्या निवडणुका लावून दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी शहा यांना दिले होते. पंरतु, त्यांचे हे आव्हान बालिशपणाचे आहे, असेही राणे म्हणाले.
हेही वाचा :