Latest

नारायण राणेंनी मर्यादा सोडली; त्यांचे केंद्रीय मंत्रीपदही जाईल : संजय राऊत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "नारायण राणेंना पक्ष सोडल्यावर कधीही भेटलो नाही. मी कधी गद्दारांना भेटत नाही. नारायण राणेंची कामगिरी शून्य आहे. आरोपांपेक्षा त्यांनी काम करावे. त्यांच्याबाबत संयम राखला पण त्यांनी आता मर्यादा सोडली आहे. माझ्या माहितीनुसार त्यांचे केंद्रीय मंत्रीपद जातय, असे भाकीत करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले." नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेच्या मुखपत्रातील एका अग्रलेखावरून केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध संजय राऊत असा वाद पेटला आहे. संजय राऊत आजच्या राजकारणातील जोकर आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज केली होती. यावर बोलाताना राऊत म्हणाले,  "आमच्या नादाला लागलात तर आम्ही काय आहे ते कळेल. फार धमक्या दादागिरी करू नका. तो लाचार माणूस आहे. घाबरून दहा पक्ष बदलतो. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा झाली हे चांगले आहे. मी निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर चिखलफेक करण्यास सुरूवात राणेंनी केली. शिंदे गटाला सामावून घेण्यासाठी त्यांचे केंद्रीय मंत्रीपद जाईल," असे भाकीत त्यांनी केले.

कायद्यानुसार १६ आमदार अपात्र ठरतील

४० आमदारांना खुश करणे हे राज्यसरकारचे काम आहे. महाराष्ट्रात २०२४ ची तयारी सुरू आहे पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकते. जर न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही, तर संविधान, घटना आणि कायद्याच उल्लंघन करणारे बेकायदेशीर सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. कायद्यानुसार १६ आमदार अपात्र ठरतील. सरकार व्हेंटिलेटरवर आहे. सरकार उलथविण्याच्या तयारीत जनता आहे. शिवसेना एकच आहे गट-तट तात्पुरते आहेत. सरकारमध्ये २ गट पडले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

शिंदे गटातील सर्वजण भाजपमध्ये जाणार

नागपूर अधिवेशनकाळात सरकारचा गोंधळ दिसला. राज्यात सरकार अस्तित्वात नाही, असं दिसतंय. रोज मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असताना सरकार जणू काही घडलच नाही आणि विरोधी पक्षच गुन्हेगार आहे, असे काम करत आहे. एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांची भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरणे उघड होऊनही सरकार वेगळ्या पद्धतीचे काम करत आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आले नाही. राज्यकर्त्यांनी संयमाने राज्य चालवायचे असते. सुडबुद्धीने काम करणाऱ्याला राजा म्हणत नाहीत राक्षस म्हणतात. शिंदे गटातील सगळे भाजपमध्ये जातील कारण अपात्र ठरल्यानंतर त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसेल. आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत. एवढच केंद्राच्या हातात आहे. जर अपात्र ठरले नाहीत तर तो संविधानाचा सगळ्यात मोठा अपमान ठरेल. त्यामुळे कायद्यानुसार ते अपात्र ठरतीलच, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT