महाप्रसादातून विषबाधा 
Latest

नांदेड : महाप्रसादातून दोन हजार लोकांना विषबाधा; लोहा तालुक्‍याच्या पोस्‍टवाडीतली घटना

निलेश पोतदार

लोहा; पुढारी वृत्तसेवा लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामांच्या पालखी निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाप्रसाद घेण्यासाठी सावरगाव, नसरत, रिसनगाव, हरणवाडी, आष्टूरसह गावातील हजारो लोक उपस्थित होते. यामध्ये भगर खाल्याने रात्री दोन वाजल्यापासून हजारो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले. उलटी होणे, डोके दुखणे, चक्कर येणे असा प्रकार होत असल्याने रात्री दोन वाजल्‍यापासून रुग्णांना लोहा शहरात शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात झाली होती. परिस्थिती वाढतच असल्याने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेला सतर्क केले.

लोहा तालुक्यात कोष्टवाडी या छोट्याशा गावात बाळूमामाच्या पालखीचे आयोजन केले होते. या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महाप्रसाद घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांना निमंत्रण दिले होते. सावरगाव, रिसनगाव, हरणवाडी, आष्टूरृसह अन्य गावातील बाळूमामांचे भक्त या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादात भगरचा समावेश करण्यात आला होता. याचा हजारो लोकांनी लाभ घेतला व सर्व लोक आपापल्या घरी परत गेले. या लोकांना रात्री दोन वाजल्यापासून त्रास जाणवायला लागला. यामध्ये चक्कर येणे, उलट्या होणे, डोके दुखणे असा प्रकार जाणवू लागल्याने सुरुवातीला काही रुग्ण लोहा शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल झाले.

परिस्थिती वाढतच असल्याने ही बाब पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांना कळविण्यात आली. त्यांनी तात्काळ प्रकार लक्षात घेऊन शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना सूचना करून रुग्णांना दाखल करून घेण्यास सांगितले. तसेच एसटी बस बोलावून व खासगी वाहने ट्रॅव्हल्स जीप यामध्ये रुग्णांना बसवून नांदेड, कंधार, अहमदपूर जिल्हा लातूर पालम जिल्हा परभणीकडे रुग्ण पाठवण्यासाठी सूचना केल्या. याची वरिष्ठांना माहिती देऊन लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात औषधात वाढ करून रुग्णांना अडचण होणार नाही याची दक्षता घेतली.

विषबाधा झालेले रुग्ण लोहा शहरातील ग्रामीण रुग्णालय व जवळपास पंधरा खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. यासह विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल झाले असून, सामान्य जिल्हा रुग्णालयात देखील जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसेकर यांनी रुग्णांना दाखल करण्याच्या सूचना केल्‍या आहेत. उपचार सर्व रुग्णालयात करण्यात येत असून चार ते पाच तासानंतर परस्थिती आटोक्यात आल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.

कोष्टवाडी वाडी व परिसरातील गावातील लोकांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णांना उपचार मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर,, डॉक्टर अब्दुल बारी, दीपक मोटे माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, नायक तहसीलदार अशोक मोकळे, बांधकाम विभागाचे उप अभियंता शिवाजी राठोड, खासगी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अनिल धुतमल यांचे मोलाचे सहकार्य रुग्णांना झाले.

हजारो रुग्ण ग्रामीण रुग्णालय लोहा येथे दाखल होत असल्यान औषध पुरवठा कमी पडू नये यासाठी दक्षता घेण्यात आली. पोलीस निरीक्षकांनी नांदेड येथे आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून मुबलक औषधसाठा तात्काळ नांदेड वरून लोहाकडे रात्रीच मागवून घेतला. यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात कोणतीही अडचण भासली नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
रात्री दोन वाजल्यापासून पोस्ट वाडी व परिसरातील लोकांना विषबाधा झाली. त्याच वेळेपासून रुग्णांना लोहा शहर व नांदेड व अन्य ठिकाणी दाखल करून उपचार करण्यात आले. आता परिस्थिती आटोक्यात आली असून, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही असे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे..

लोकांनी घाबरून जाऊ नये रुग्णालयात उपचार घ्यावा : जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भोसीक

लोहा तालुक्यात विषबाधा होऊन रुग्णांची संख्या हजारोत गेल्याचे कळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भुशी कर हे तात्काळ ग्रामीण रुग्णालय व खासगी रुग्णालय लोहा येथे दाखल झाले. त्यांनी सर्व रुग्णांना भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली व आरोग्य विभागाला योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्‍या. लोकांनी घाबरून जाऊ नये रुग्णालयात दाखल होऊन उपचार करून घ्यावे रुग्णांना व्यवस्थित उपचार केले जातील असे सांगून कोणीही घाबरू नये असे आवाहन केले आहे. हा प्रकार कशामुळे घडला याची त्या यंत्रणेकडून चौकशी करण्यात येईल असे सांगितले.

तहसीलदार शंकर लाड यांनी कोष्टवाडी येथे भेट देऊन झालेली घटनेची गावकऱ्यांकडून माहिती घेतली व रुग्णांनी घाबरून न जाता रुग्णालयात दाखल होऊन योग्य ते उपचार घ्यावेत असे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निल पत्रे वार नायब तहसीलदार अशोक मोकले, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT