नागपूर; पुढारी वृत्तसेवा: सीमावादावर कर्नाटक विधानसभेने जो ठराव मंजूर केला, त्याच्या दहापट चांगला आणि प्रभावी प्रस्ताव आम्ही महाराष्ट्रात मांडू, असे सीमाभागासाठीचे समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. कर्नाटक विधानसभेत सीमाभागातील मराठी भाषकांच्या भावना दुखावणारा, महाराष्ट्र विरोधी प्रस्ताव संमत करण्यात आल्याने राज्यात संतापाची भावना आहे.
या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पुण्यातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे काल निधन झाले. त्यामुळे सभागृहात शोकप्रस्ताव असल्याने महाराष्ट्र- – कर्नाटक सीमावादावरील ठराव सभागृहात मांडता आला नाही. सीमाभागाविषयी महाराष्ट्राची जी भूमिका आहे, त्याचे विस्तृत चित्र या ठरावात असेल.
हा प्रस्ताव मांडताना कुठेही आपल्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री यांच्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र, या बैठकीत जे ठरले त्या उलट कर्नाटकचे मुख्यमंत्री वागत आहेत. आम्ही त्यांची आक्षेपार्ह वक्तव्ये सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.