File Photo  
Latest

Maharashtra Congress : विदर्भात काँग्रेस सोडून कोण-कोण हातात ‘कमळ’ घेणार?

अविनाश सुतार


नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. गेले अनेक दिवस भाजप वर्तुळात ही चर्चा असल्याने त्यांची पावले काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपचे 'कमळ' हाती घेण्यासाठीच पुढे पडत असल्याचे आता उघड झाले आहे. अर्थातच दोन दिवसांत पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. Maharashtra Congress

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी (दि.१५) महाराष्ट्रात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांचे प्रवेश होतील, असे बोलले जात आहे. आज चव्हाण समर्थक आमदार अमर राजूरकर यांनीही राजीनामा दिला. सोमवारी दिवसभरातील राजकीय घडामोडींनी राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. आता अशोक चव्हाण यांच्यासोबत राज्यात, विदर्भातील कोण कोण काँग्रेस सोडणार आणि भाजपमध्ये जाणार, या चर्चेने जोर धरला आहे. नागपुरात दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघात दावेदार म्हणून पदाधिकाऱ्यांनी पसंती दिलेले आमदार विकास ठाकरे यांचे नाव आज चर्चेत आले. Maharashtra Congress

मात्र, अनेक वर्षे मी भाजपात जाणार असे बोलले जाते, यात दम नाही असे ठाकरे यांनी तूर्त स्पष्ट केले. किमान 12-15 आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांचेही नाव चर्चेत आहे. पण त्यांना अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्यापेक्षा रामटेकचा लोकसभेचा पर्याय असल्याची माहिती आहे.

विश्‍वसनीय सूत्रानुसार, आज जी नावे पुढे आलीत यात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आमदार प्रतिभा धानोरकर यांचेही नाव आहे. गेल्यावेळी काँग्रेसच्या वाट्याला राज्यात आलेली एकमेव लोकसभा जागा चंद्रपूरची होती. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या या जागेवर प्रतिभा धानोरकर यांचा हक्क असल्याने त्या काँग्रेसचा हात सोडतील का ?, याविषयीचे गूढ कायम आहे. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे आमदार सहशराम कोरेटे, मराठवाड्यातील अमर राजूरकर अशी ही यादी आहे.

यापैकी सुभाष धोटे यांनीही राजूरकर यांच्याप्रमाणे राजीनामा दिल्याची माहिती आहे, पण त्यांनी नकार दिला आहे. या यादीत असलेले बहुतांशी आमदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. काही काँग्रेस आमदार शिंदे शिवसेना गटात तर काही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय स्वीकारणार असल्याची माहिती आहे. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचेही नाव आज चर्चेत आहे. पण त्यांचे पती संजय खोडके यांनीही इन्कार केला आहे.

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी हा दावा निराधार ठरवत शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे जाहीर केले. यवतमाळ जिल्ह्यातील कुणीही चव्हाण यांच्यासोबत जाणार नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा निर्णय दुर्देवी असल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात दोनदा मंत्रीपद भूषविणारे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेही नाव आज चर्चेत आले. आमचे सौहार्दपूर्ण संबंध लक्षात घेता या चर्चा रंगणे स्वाभाविक आहे. पण आपण कुठेही जाणार नाही. मी मतदारसंघात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखते रहो,आगे आगे होता है क्या… असे संकेत दिले. यामुळे अनेक सावज त्यांच्या टप्प्यात आहेत. जे गेले ते पण बराच काळ असेच बोलल्याने एकंदरीत काँग्रेसला खिंडार नक्की आहे. मात्र, नेमके कोण जाणार, हे लवकरच राज्यातील जनतेला कळणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT