पुढारी ऑनलाईन डेस्क : डेव्हिड वॉर्नर (David Warner) इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने बुधवारी (20 एप्रिल) हंगामातील सलग तिसरे अर्धशतक झळकावले. या धडाकेबाज सलामीवीराने पंजाब किंग्जच्या गोलंदाजांवर आक्रमण करत अवघ्या 30 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. ही तीच खेळपट्टी होती, जिथे प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या गोलंदाजांनी पंजाबला 115 धावांत गुंडाळले होते.
कागिसो रबाडा असो की राहुल चहर, पंजाबचे सर्व गोलंदाज वॉर्नरसमोर (David Warner) अपयशी ठरले. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीने 10.3 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करून सामना नऊ विकेटने जिंकला. सामना संपल्यानंतर वॉर्नरला खूप आनंद झाला. त्याने आपल्या सहकारी खेळाडूंच्या योगदानाचे कौतुकही केले. पण वॉर्नरने एक मोठा असा खुलासा केला. तो म्हणाली की, जोस बटलरप्रमाणे मी शतक का झळकावत नाही, असा प्रश्न माझ्या मुली मला विचारत आहेत. शतक कर नाहीतर.. अशी जणू धमकीच त्यांच्याकदून मला दिली जात आहे. अर्धशतकाचे शतकात रुपांतर करण्यात मी अपयशी ठरलो आहे. पण पुढील सामन्यांमध्ये मी शतक झळकावून असा विश्वास आहे. हे एकप्रकारे माझ्या मुलींसाठी गिफ्ट असेल, अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
वॉर्नरने (David Warner) लागोपाठ तीन अर्धशतके झळकावली असली, तरी या 60-70 धावा पुरेशा आहेत असे त्याच्या लहान मुलींना वाटत नाही. हा डावखुरा फलंदाज जोस बटलरप्रमाणे शतक का करत नाही हे त्याच्या मुलींना जाणून घ्यायचे आहे, असे वॉर्नरने विजयानंतर सांगितले.
पंजाब किंग्जविरुद्ध दिल्लीच्या गोलंदाजांच्या कामगिरीचे वॉर्नरने कौतुक केले. वॉर्नर म्हणाला, 'माझ्या मते गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे फलंदाजासांठी सोपे झाले. लक्ष्याचा पाठलाग करताना आम्हाला पॉवरप्लेमध्ये मेहनत घ्यावी लागली. मी फक्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत होतो. मला पृथ्वी शॉसोबत खेळताना आनंद येतो.'
आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक, वॉर्नरने (David Warner) मागील हंगामाच्या समाप्तीनंतर सनरायझर्स हैदराबाद संघ सोडला. तथापि, 35 वर्षीय खेळाडूला यंदाच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आणि या हंगामात त्याने आतापर्यंत दिल्लीसाठी चांगली कामगिरी केली आहे.
राजस्थान रॉयल्सचा (RR) जोस बटलर यंदाच्या आयपीएलमध्ये अतिशय धोकादायक फॉर्ममध्ये दिसत आहे. या फलंदाजाने आतापर्यंत केवळ 6 सामन्यात 75 च्या सरासरीने आणि 156.90 च्या स्ट्राईक रेटने 375 धावा कुटल्या आहेत. बटलरने आयपीएलच्या 15 व्या मोसमात आतापर्यंत दोन शतकेही झळकावली आहेत.