कुर्ला; पुढारी वृत्तसेवा : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कुर्ल्यात एक १३ वर्षीय मुलगी थेट चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली. परंतु, तिच्या हाताला किरकोळ दुखापत वगळता कोणतीही मोठी इजा झाली नाही आणि तिचा जीव वाचला आहे.
सखीरा इस्माईल शेख (१३) असे या मुलीचे नाव असून ती तिच्या कुटुंबासह कुर्ला नेहरूनगर येथील मिडासभूमी हार्मनी या सतरा मजली इमारतीमध्ये चौदाव्या मजल्यावर राहते. १० डिसेंबरला सखीरा हिचा वाढदिवस होता. वाढदिवसाला आलेल्या भेटवस्तू घेऊन सखीरा ही घराच्या खिडकीजवळ खेळत होती. अचानक खिडकीतून सखीराचा तोल गेला आणि ती चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली. मात्र कोसळत असताना झाडांच्या फांद्या आणि इमारतीखालील शेडच्या पत्र्याला धडकत ती खाली कोसळली. मुलगी इमारतीखाली पडल्याचे कळताच संपूर्ण कुटुंबाच्या काळजात धस्स झाले. ते इमारतीच्या खाली धावले. मात्र त्यांना तिथले दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. सखीराला हाताला थोडीफार दुखापत झाली होती, मात्र ती सुरक्षित होती. तिला सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले असून आता ती पूर्णपणे सुरक्षित आहे.
हेही वाचा :