Mumbai  
Latest

Mumbai : ११ वर्षीय चिमुरड्याचा रेकॉर्ड! धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया ९ तास ५ मिनिटांत पार

सोनाली जाधव

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीकर निर्भय संदीप भारती या ११ वर्षीय जलतरणपटूने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया असे ४० किलोमीटरचे सागरी अंतर न थांबता ९ तास ५ मिनिटांत पोहून पार करत नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. या चिमुरड्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. निर्भय हा डोंबिवलीतील शाळेमध्ये सहाव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. (Mumbai )

निर्भयने धरमतर (अलिबाग) ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर ८ तास ३० मिनिटांत पोहून पार करण्याचा निर्धार केला होता. परंतु कासा खडकाच्या पुढे सकाळी १० वाजता वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे समुद्रात लाटा उसळल्या. समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा मारा सहन करत त्याला पुढे गेट वे पर्यंत पोहून जावे लागले. त्यामुळे त्याला निर्धारित वेळेत अंतर कापता आले नाही. १ जानेवारी रोजी पहाटे अंगाला ग्रीस लावून व समुद्राची पूजा करून ३ वाजून ०५ मिनिटांनी महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे पर्यवेक्षक नील लबदे यांच्या निरीक्षण- ाखाली निर्भयने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहण्यास सुरुवात केली.

निर्भय भारती हा प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली यश जिमखान्यामध्ये दररोज ८ ते ९ तास अथक सराव करतो. मेहनत व जिद्द पाहून यश जिमखान्याचे संचालक राजू वडणेरकर यांनी त्याला रात्रीच्या वेळेसही सरावासाठी स्विमिंग पूल उपलब्ध करून तर दिलाच शिवाय धाडसी व साहसी मोहिमेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच महिन्यातून ४ वेळा उरण येथील संतोष पाटील यांनी त्याच्याकडून समुद्रात सराव करून घेतला.

Mumbai : यापूर्वीही पार केले होते २२ किमीचे सागरी अंतर

या आधीही निर्भयने ५ ऑक्टोबरला कारंजा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया असे २२ किमीचे सागरी अंतर न थांबता ६ तास ३४ मिनिटांत पोहून रेकॉर्ड केला आहे. निर्भय भारती याला त्याचे वडील संदीप, आई वृषाली, महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटना, ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन, तसेच यश जिमखान्याचे प्रशिक्षक विलास माने, रवी नवले आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे तो हे अंतर सहजरीत्या पार करू शकला. गेट वे ऑफ इंडियाला पोहोचल्यावर सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT