Shweta Ambikar marriage  
Latest

Shweta Ambikar : या अभिनेत्रीचे विवाहाचे फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

स्टार प्रवाह वरील मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री श्वेता आंबिकर (Shweta Ambikar) ही विवाहबंधनात अडकली. तिने या मालिकेत आर्याची भूमिका साकारलीय. (Shweta Ambikar) काही दिवसांपूर्वी श्वेताच्या केळवणाचे एक्सक्लूजिव्ह फोटोज व्हायरल झाले होते.

Shweta Ambikar

त्यांच्या लग्नाला मुलगी झाली हो फेम किरण माने यांनी हजेरी लावली होती. माने यांनी वधूवर सोबतचा एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलाय. सोबतचं एक मोठी पोस्ट लिहिलीय.

या पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलंय-

श्वेते, लै आनंद झाला. तुझ्या मनातला जोडीदार तुला मिळाला. तुमी दोघं म्हंजी लव्हबर्डस् जनू! लै वर्ष तुम्ही दोघांनी एकमेकांची वाट पाहिलीत.. परवा विवाहबंधनात अडकताना तुमच्या दोघांच्याबी डोळ्यांतले आनंदाश्रू लै काय काय सांगून जात होते..

…आपल्या क्षेत्रात तुझ्याइतकी आणि प्राजक्ता-शितलीइतकी मैत्री माझी लै कमी जनांबरोबर हाय… कारन कुठल्याबी सेटवर मी सुरूवातीला सहकलाकारांपासुन जरा अंतर ठिवूनच असतो… जवा पयल्यांदा या फिल्डमधी आलो तवा आलेल्या काही वाईट अनुभवांमुळं माझ्यात 'स्माॅल टाऊन काॅम्प्लेक्स' होता… नंतर मी त्याच्यावर मात केली आनि उभा र्‍हायलो. पन तरी समोरच्यानं दिलखुलासपने मैत्रीचा हात पुढं केल्याशिवाय मी धजावत नाय. तुम्ही तिघींनी ते केलं आनि मग आपली धम्म्माल सुरू झाली !

श्वेते, तू लै लै लै नादखुळा हायेस. अभिनेत्री म्हनून टॅलेन्टेड हायेस. अशा अभ्यासपूर्ण आणि मनापास्नं काम करनार्‍या लै कमी पोरी हायेत… त्यातली तू एक ! पर्सनल आयुष्यातबी तू एक व्यक्ती म्हनून खूप मेहनती आहेस. स्वत: ड्राईव्ह करत मुंबै-पुने-सातारा प्रवास करनं.. पंक्चर किंवा गाडीत किरकोळ बिघाड झाला तर रस्त्याच्या कडेला गाडी लावून जॅक लावून स्टेप्नी चढवनं, बॅंकेची-कोर्टकचेरीची सगळी कामं एकहाती करनं.. मलाबी अजून हे जमत नाय गं !!!

तुझ्या वडिलांशी तू इमोशनली लै कनेक्टेड होतीस. कुठलीबी पोरगी असतेच. बापलेकीचं नातंच लै जगावेगळं असतं. दुर्दैवानं सहासात महिन्यांपूर्वी कोरोनामुळे त्यांच्या सावलीला पारखी झालीस. त्यांनी जाण्यापूर्वी तुझ्या लग्नासाठी कार्यालय बुक करन्यापास्नं केटरर-मेन्यू ठरवण्यापर्यंत सगळं करून ठेवलंवतं.. लै एक्सायटेड होते ते बी.. पन… असो. आईला तू सांभाळशीलच, त्याची काळजी त्यांना नसेल.. जिथं कुठं ते असतील तिथून त्यांनी तुम्हा दोघांसाठी आशीर्वाद दिले असतील.. लै खुश असतील ते… तुझ्यासाठी !

..'मुलगी झाली हो' सिरीयलमध्ये आपलं सासरा-सुनेचं नातं लै लै लै अफलातून हाय. बापलेकीसारखं. मुलीबरोबरच्या किंवा सुनेबरोबरच्या प्रत्येक इमोशनल सिनला तू प्रचंड भावनिक होतेस.. वडिलांच्या आठवणीनं व्याकूळ होतेस.. मग कॅमेर्‍यामागे आपला बापलेकीचा एक वेगळा सिन होतो.. प्राजक्ता तिच्या बाहूलीला सावरायला येते.. शितली वातावरन हलकंफुलकं करते..आनि परत आपन हसत-खिदळत कामाला सुरूवात करतो ! 'मुलगी झाली हो'नं मला अनेक गोष्टी भरभरून दिल्यात..छप्पर फाड के दिल्यात.. त्यातली एक म्हन्जे आपली मैत्री !!

तुम्हाला पुढच्या भन्नाट जबराट सहजीवनाला लैSSS मनापास्नं शुभेच्छा… लब्यू. ❤️

-किरण माने. @shweta_ambikar

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT