Latest

MS Dhoni Ban : ‘धोनीवर येणार बंदी’, सेहवागने का दिला मोठा इशारा?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : MS Dhoni Ban : महेंद्रसिंग धोनीला आयपीएल दरम्यान बंदीला सामोरे जावे लागू शकते. हे आम्ही म्हणत नाही, पण भारतीय क्रिकेटचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग असे मानतो. वीरूने सीएसकेच्या गोलंदाजांना इशारा देत, कामगिरी सुधारण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा संघाला नव्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल, असा टोला लगावला आहे.

वास्तविक, सीएसकेचे अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतीशी झुंजत आहेत. काही संपूर्ण हंगामातून बाहेर पडले आहेत तर काही दुखापतीमुळे संघाचा भाग बनू शकलेले नाहीत. यात दीपक चहर, मुकेश चौधरी, सिसांडा मगाला आणि बेन स्टोक्स या खेळाडूंचा समावेश आहे. अशा स्थितीत संघाचे युवा गोलंदाज निराशाजनक कामगिरी करत दर सामन्यावेळी अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणात देत आहेत. सोमवारी (दि. 17) बेंगलोर विरुद्ध झालेल्या सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजांनी सहा वाईड चेंडू टाकले, ज्यामुळे बराच वेळ वाया गेला. अशा परिस्थितीत सीएसके संघ दोनदा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास कर्णधार धोनीवर बंदी घातली जाऊ शकते. (MS Dhoni Ban)

यावरच सेहवागने त्याचे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला की, 'आरसीबीविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी सीएसकेला संघर्ष करावा लागला. धोनीच्या संघाने पहिला फलंदाजी करत आरसीबीला मोठे टार्गेट दिले. त्यामुळे हा सामना ते सहज जिंकतील असे मानले जात होते. पण आरसीबीच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत सीएसकेला घाम फोडला. त्यांनी 8 धावांनी कसाबसा हा सामना जिंकला. आव्हानात्मक धावसंख्या उभी करूनही सीएसकेचे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना वेसण घालू शकले नाहीत, यावर लक्ष देणे गरजेचे आहे. गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहून खुद्द धोनीही आनंदी दिसत नव्हता. खरे तर त्याने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, गोलंदाजांना नो-बॉल आणि वाईड बॉलवर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा संघाला नव्या कर्णधारासोबत खेळावे लागेल.' (MS Dhoni Ban)

सीएसकेने आत्तापर्यंत दोन ते तीन अतिरिक्त षटके टाकली आहेत आणि आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही त्यांनी जवळपास एक अतिरिक्त षटके टाकले आहे. त्यामुळे धोनीचा इशारा पुढील काही सामन्यांनंतर सत्यात उतरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सेहवाग पुढे म्हणाला, धोनीच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धोनीच्या गुडघ्याला ज्या प्रकारची दुखापत झाली आहे, त्यावरून तो अजून काही सामने खेळू शकेल असे दिसते. पण त्या आधी गोलंदाजांनी वाइड्स आणि नो बॉल टाकण्यात सातत्य ठेवले तर धोनीला नक्कीच विश्रांती घ्यावी लागेल, अशी दाट शक्यता आहे,' असा इशार त्याने दिला

धोनीने दिली होती धमकी

याआधी धोनीने 3 एप्रिल रोजी लखनऊविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर आपल्या गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली होती. सामन्यानंतर त्याने गोलंदाजांना थेट धमकी देत वेगवान गोलंदाजीत सुधारणा आवश्यक आहे. त्यांना परिस्थितीनुसार गोलंदाजी करावी लागेल. जर विकेट खूप सपाट असेल तर तुम्ही फलंदाजाला क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून फटका मारण्यासाठी संधी निर्माण केली पाहिजे. या जाळ्यात ते नक्की सापडतील आणि संघाला फायदा होईल. पण त्यातच गोलंदाजांनी वाइड्सवर आणि नो बॉलवर नियंत्रण ठेवावे लागेल. आम्ही अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणात देत आहे. त्या कमी कराव्या लागतील. अन्यथा नव्या नेतृत्वाखाली खेळावे लागेल, असे म्हटले होते.

आता चेन्नईचे गोलंदाज आपली कामगिरी सुधारतात की नाही हे पाहावे लागेल. कारण स्लो ओव्हर रेटमुळे धोनी संघासोबत नसेल तर चेन्नईला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT