Latest

कितीही संकटे आली तरी लातूरचा देशमुख वाडा तिथेच राहणार : आमदार अमित देशमुख

अमृता चौगुले

विटा; पुढारी वृत्तसेवा : 'कितीही संकटं आणि वादळं आली तरी लातूरचा देशमुखवाडा आहे तिथेच राहणार', ही संस्काराची श्रीमंती विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे तुम्हीच स्वगृही यावे, असं मी म्हणालो, तर ते अधिक संयुक्तीक ठरेल, असे म्हणत भाजप प्रवेशाची ही जाहीर ऑफर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी विट्यात जाहीरपणे धुडकवली.

निमित्त होते सेंद्रीय शेतीचे अभ्यासक जयंत बर्वे यांचा कृतज्ञता सोहळा आणि नेचर केअर फर्टिलायझर्स कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमीत्त कार्यक्रम आयोजित कार्यक्रमाचे. या सोहळ्यात सांगली खासदार संजय (काका) पाटील यांनी जाहीरपणे अमित देशमुख यांना भाजपमध्ये येण्याचे ऑफर दिली. तितक्यास नम्रपणे आमदार अमित देशमुख यांनी ही ऑफर जाहीरपणे धुडकावत त्यांनाच काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली.

यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले, मला तुमच्या घरी या म्हणताय, परंतु तुम्हीच सगळे मिळून माझ्या घरी यावं. असं जर मी म्हणलो तर तेच अधिक संयुक्त ठरेल,असा मला विश्वास आहे आणि त्याची सुरुवात इथून विट्याच्या बर्वे वाड्यातून व्हावी. अमित देशमुख पुढे म्हणाले, खासदार पाटील यांनी जरी मला निमंत्रण दिले असले तरी या व्यासपीठावर मी राजकीय बोलणार नाही. हा घरगुती कार्यक्रम आहे, असे म्हणत आम्ही भिन्न विचाराचे नाही. आमचे विचार एकच आहेत. या दुष्काळी भागाचा या विट्याचा सर्वांगीण विकास झाला, तो काय फक्त गेल्या पाच वर्षात झालेला नाही. हे जाहीरपणे जरी तुम्ही मान्य करीत नसला तरी खासगीत नक्कीच मान्य करता, असेही ते म्हणाले.

सुरूवातीला बोलताना खासदार संजय पाटील यांनी आज दिवसभर संभाजी पाटील निलंगेकर यांची आमदार अमित देशमुख यांच्या बाबतीतली भाजप प्रवेशाबाबतची चर्चा सुरू आहे. आता तुम्ही आमच्या जिल्ह्यात आला आहात. सांगली जिल्हा आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांचा विशेष जिव्हाळा राहिला आहे. बर्वे यांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आला आहात. आम्हाला आश्चर्य वाटते की, विलासराव देशमुख आणि बाबा बर्वे हे अगदी भिन्न विचाराचे असून त्यांच्यात मैत्री कशी झाली? त्यांच्या बर्वे वाड्यात गेली ३० वर्षे संघाची शाखा चालत आहे आणि तुमचे घराणे काँग्रेसचे व मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे या घरच्या कार्यक्रमात मी तुम्हाला आमच्याकडे येण्याचे निमंत्रण देतो, तुम्ही आल्याने तुमचे राज्य भरात असणारे विलासराव देशमुख प्रेमी मंडळी भाजपकडे येतील, अशा शब्दात खासदार संजय पाटील यांनी आमदार अमित देशमुख यांना भाजप प्रवेशाचे आमंत्रण जाहीर दिले.

यावेळी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील, जयदेव बर्वे, कामाक्षी बर्वे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षातले हे तिसरे सरकार, चौथे कधी येईल

आपल्या भाषणात आमदार अमित देशमुख म्हणाले, ही पाच वर्षे चमत्कारीक आहेत. पाच वर्षातील हे तिसरे सरकार आहे. पहिले अडीच दिवसाचे, दुसरे अडीच वर्षाचे आणि सध्याचे तिसरे सरकार आहे. पण चौथे कधी येईल, काही सांगता येत नाही. निवडणुका तर होतच नाहीत. विट्यातही प्रशासक आहे. मात्र या परिस्थितीतही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आमदार- खासदार, लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला पाहिजेत, असेही माजी मंत्री आमदार देशमुख म्हणाले.

शांतता राखा कोर्ट सुरू होणार आहे : आमदार देशमुख

सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचे काम आमच्या महाविकास आघाडी सरकारने सुरू केले होते. परंतु, आताचे जे सरकार आले आहे असे म्हणत आमदार अमित देशमुख यांनी आमदार बाबर यांच्याकडे पाहत काय नाव ठेवले आहे तुम्ही या सरकारचे ? असा प्रश्न केला. त्यावर आमदार बाबर उत्तरले "भाजप सेना !" त्यावर लगेच त्यांनी शिवसेना शिंदे गट – भाजप असे तूर्त तरी म्हणावे लागेल. कारण मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे टिप्पणी करत शेवटी हे सगळे सर्वोच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे शांतता राखा कोर्ट सुरू होणार आहे, असा टोलाही आमदार देशमुख यांनी लगावला.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT