Latest

MP Pramila Bisoi : लक्षवेधी खासदार ‘परी माँ’

मोहन कारंडे

संसद भवनाच्या परिसरात साधी कॉटनची साडी, पायात स्लीपर अशा रूपात दिसणार्‍या या आहेत बिजू जनता दलाच्या खासदार प्रमिला बिसोई. त्यांची ओळख 'परी माँ' या नावाने आहे. 2019 मध्ये त्यांना बिजदने गंजम जिल्ह्यातील अस्का या आदिवासी भागातील मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट दिले. तिकीट मिळेपर्यंत त्या पकिडी या गावात प्राथमिक शाळा व अंगणवाडीत माध्यान्ह भोजन बनवण्याचे काम करायच्या.

जंगल पुन्हा वसवले

वयाच्या पाचव्या वर्षी लग्न झालेल्या प्रमिला बिसोई यांनी पकिडी येथे आपले आयुष्य घालवले; पण त्यांनी ध्यास घेतला तो जंगल, पर्यावरण रक्षणाचा, मोरांच्या संरक्षणाचा आणि महिला सबलीकरणाचा. गावातील महिलांना एकत्र करीत त्यांनी या भागाचे जंगल नव्याने वाढवले. 2006 नंतर येथील वृक्षतोड आणि शिकार पूर्णपणे थांबली आहे.

मोरांचे अभयारण्य

एकेकाळी पकिडीच्या जंगलात मोरांची संख्या खूप होती; पण नंतर ते जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर असताना प्रमिला बिसोई यांनी मोरांच्या रक्षण व संवर्धनाचे काम हाती घेतले. आज पकिडीच्या जंगलात 3 हजार मोर आहेत.

महिलांच्या सबलीकरणासाठी

महिला सक्षम व्हाव्यात यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत. ओडिशात महिला बचत गटांची चळवळ त्यांनी महत्प्रयासाने उभी केली व वाढवली. आदिवासी, गरीब महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबाबत त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला आहे.

संसद कामकाजात सहभाग

प्रमिला बिसोई संसदेच्या कामकाजात आवर्जून सहभागी होतात. 75 वर्षे वय असलेल्या या 'परी माँ' यांची लोकसभेत 69 टक्के उपस्थिती आहे. 50 हून अधिक प्रश्न आणि 8 चर्चांत सहभाग नोंदवताना त्यांनी महिला सक्षमीकरण, वन व पर्यावरणाचे रक्षण आणि स्थानिक समस्या यांच्यावरच जोर दिला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT