Latest

Turkey earthquake | तुर्की, सीरियात मृत्‍यूचे तांडव, भूकंप बळींची संख्या ४ हजारांवर, पाऊस, बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे

दीपक दि. भांदिगरे

इस्तंबूल; पुढारी ऑनलाईन : शक्तीशाली भूकंपाने हादरलेल्या तुर्की आणि सीरियातील मृतांचा आकडा ४ हजारांहून अधिक असल्याचे वृत्त द असोसिएटेड प्रेसने दिले आहे. तर मृतांचा आकडा ४,३०० हून अधिक असल्याचे बीबीसीने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. एकट्या सीरियामध्ये १,४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या शक्तिशाली भूकंपानंतर दक्षिण तुर्की आणि उत्तर सीरियाच्या अनेक भागात बचावकार्य सुरू आहे. पण पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे आला आहे. (Turkey earthquake)

तुर्कीला काल सोमवारी सकाळी भूकंपाचे एकापाठोपाठ ७.८, ७.६ आणि ६.० अशा तीव्रतेचे सलग तीन धक्के बसले. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. भूकंपामुळे शेकडो इमारती कोसळल्या असून तुर्कीसह सीरियामध्ये बेघर झालेल्या हजारो लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. भूकंपाच्या केंद्रबिदूंपासून सुमारे ३३ किलोमीटर (२० मैल) अंतरावरील प्रांतीय राजधानी असलेल्या तुर्कीच्या गॅझियानटेप शहरात लोकांनी शॉपिंग मॉल, स्टेडियम, मशिदी आणि कम्युनिटी सेंटरमध्ये आश्रय घेतला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी ओरहान तातार यांच्या म्हणण्यानुसार, १० प्रांतांमधील ७,८०० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. एकापोठापाठ एक महाभयंकर भूकंपाने हादरलेल्या तुर्कीला आगामी पाच दिवस भूकंपाचा धोका असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, तुर्कीतील बचावकार्यात बर्फवृष्टीमुळे प्रचंड अडथळे येत असून त्यामुळे ढिगार्‍याखालून माणसांना जिवंत काढणे कठीण झाले आहे. आताच मृतांचा आकडा अडीच हजारांच्या जवळ गेला असून तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींची संख्या दहा हजार होण्याची भिती वर्तवली जात आहे.

युनायटेड स्टेटस् जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार पहिल्या तीन भूकंपानंतर ७८ आफ्टरशॉक (नंतर बसलेले धक्के) नोंदवले गेले. या सर्व धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ पेक्षा जास्त होती. पहिल्या भूकंपानंतर झालेल्या ७ मोठ्या भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर ५ पेक्षा जास्त होती. आणखी पुढेही काही दिवस आफ्टरशॉक जाणवतील, असे युनायटेड स्टेटस् जिओलॉजिकल सर्व्हेचे म्हणणे आहे.

पाऊस, बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे

तुर्कीतील अनेक भागांत पारा शून्याखाली गेला आहे. भूकंप आला तेव्हाही या भागांत बर्फवृष्टी सुरू होती. भूकंपानंतर पाऊस सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी धुके पसरले आहे. तुर्कीतील विमानतळेही भूकंपाच्या तडाख्यात सापडल्याने धावपट्ट्या उखडल्या आहेत. अन्य देशांतून मदत सामग्री पाठविणेही अडचणीचे ठरत आहे. (Turkey earthquake)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT