Latest

Miraj Crime : मिरज बनले चंदन तस्करीचे ‘सिंडीकेट’, रक्तचंदनाच्या तस्करीमुळे शहर पुन्हा ‘हिटलिस्ट’वर

backup backup

मिरज ; स्वप्निल पाटील : मिरज शहर हे जिल्ह्यासह राज्यात नेहमीच हिटलिस्टवर राहिले आहे. मिरजेतील दंगल असो अथवा येथून चालणारे काळेधंदे असोत कोणत्या ना कोणत्या कारणातून 'मिरज' नेहमीच चर्चेत राहिले आहे. बंगळूरमधून कोल्हापुरात रक्तचंदनाची तस्करी करण्यासाठी मिरजेचाच वापर करण्यात आल्याने 'मिरज' आणि 'चंदन तस्करी' याला पुन्हा उजाळा मिळाला आहे. (Miraj Crime)

1980 आणि 1990 च्या दशकात मिरज म्हणजे चंदन तस्करीचे माहेरघर होते. त्या कालावधीत शेतकर्‍यांच्या बांधावरील चंदन झाडांसह कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील जंगलातील चंदनाची मिरजेतून तस्करी होत होती.

Miraj Crime : तस्करीचा मिरजेशी जवळचा संपर्क

सीमेवर असणारे मिरजेचे कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूसोबत तस्करीसाठी जवळचे नाते आहे. पूर्वी कर्नाटकातील बेळगाव, कारवार, यल्लापूर, म्हैसूर, चामराजनगर, मंड्या इत्यादी शहरांतून चालणार्‍या तस्करीचा मिरजेशी जवळचा संपर्क होता.

भारतात रक्तचंदन हे आंध्रप्रदेशातील शेशाचलम जंगलात मोठ्या प्रमाणात आढळून येते. तसेच कर्नाटकातील बंदीपूर आणि तमिळनाडूमधील मदुमलाई या जंगलात चंदन मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्याची मोठ्या प्रमाणात देशासह विदेशात देखील यंत्रणेचा 'डोळा' चुकवून तस्करी सुरू असते. अर्थात रक्तचंदनाची तस्करी होऊ नये यासाठी स्वतंत्र टास्कफोर्स तैनात असतानादेखील यंत्रणाचा 'डोळा' चुकवून तस्करी होते की, याकडे यंत्रणेकडूनच 'कानाडोळा' केला जातो हा संशोधनाचा विषय आहे.

नुकताच एक तमिळ चित्रपट 'पुष्पा' प्रदर्शित झाला आहे. रक्तचंदन तस्करीशी निगडित हा चित्रपट आहे. शेशाचलम जंगलातून मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाची तस्करी होत असल्याचे यामध्ये दाखविण्यात आले आहे.

यामध्ये जंगलातून तोडलेले रक्तचंदन विकणारे कोंडा रेड्डी आणि मंगलम सिन्नू यांना दाखविण्यात आले आहे. तर चेन्नईमध्ये तस्करीचे चंदन विकत घेणारा मुरगन याला दाखविण्यात आले आहे. परंतु, केवळ सुरुवातीला रक्तचंदनाची तस्करी करणारा 'पुष्पा' हा नंतर 'पुष्पराज' बनतो आणि अख्ख्या 'सिंडीकेट'वर राज्य करतो.

Miraj Crime : अशीच घटना यापूर्वी मिरजेत देखील घडली

अशीच घटना यापूर्वी मिरजेत देखील घडली होती. एका राजकीय पक्षाचा साधा कार्यकर्ता यामध्ये उतरतो. चंदन तस्करीमध्ये सक्रिय होतो आणि मिरजेला आपले 'सिंडीकेट' बनवून चंदन तस्करीसोबत राजकारणात देखील आपले बस्तान बसवितो. या राजकीय नेत्याकडे त्या काळात मंत्रीदेखील पायघड्या घालत येत असत. त्यामुळे याची चर्चा संपूर्ण राज्यात होत होती.

परंतु, मध्यंतरीच्या काळात मिरजेतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे फर्मान देण्यात आले. आणि तत्कालीन पोलिस अधीक्षक, मिरजेचे उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक यांनी ताबडतोब धाडी टाकण्यास सुरू केल्याने मिरजेत एका ठिकाणी साठा करून ठेवलेले चंदनाचे ढीगच्या ढीग बाहेर निघू लागले होते. त्यामुळे मिरज हे चंदन तस्करीचे माहेरघर असल्याचे उघडकीस आले होते. या झाल्या भूतकाळातील गोष्टी. परंतु, आता पुन्हा कर्नाटकातील बंगळूरमधून कोल्हापुरात रक्तचंदनाची तस्करी करण्यासाठी आडवळणी पडणार्‍या मिरजेचा वापर केल्याने हे शहर पुन्हा चर्चेत आले आहे. 'मिरज' आणि 'चंदन तस्करी' याचे समीकरण आजतागायत काही चुकलेले
नाही.

Miraj Crime : कोल्हापूर जिल्ह्यातदेखील टोळी सक्रिय?

सन 2011 मध्ये महसूल गुप्तचर संचालनालय मुंबईने जयसिंगपूर आणि कोल्हापूरमध्ये छापे टाकून सुमारे 50 कोटी रुपयांचे 200 टन रक्तचंदन जप्त करून पाच जणांना अटक केली होती. त्यावेळी पेरू आणि टॉवेल्स सापडले होते. आता कॅरेटच्या आड रक्तचंदन लपवून कोल्हापुरात तस्करी केली जात होती. दहा वर्षांनंतर पुन्हा कोल्हापूरशी रक्तचंदनाचे कनेक्शन समोर आले आहे. त्यामुळे मिरजेसह कोल्हापूरदेखील रक्तचंदन तस्करीमध्ये 'सिंडीकेट' असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील 'मुरगन' आणि मुख्य 'पुष्पा' शोधण्याची गरज आहे. यामध्ये मिरजेतील तर कोण

'पुष्पा' सहभागी नाही ना?

कर्नाटकातील कोंडा रेड्डी, मंगलम सिन्नूचे धाबे दणाणले बंगळूरमधून कोल्हापुरात रक्तचंदनाची तस्करी करणारा 'पुष्पा' यासीन इनायतउल्ला खान हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. चित्रपटात "एकवेळ चंदन सापडेल पण पुष्पा सापडणार नाही" आणि "पुष्पा सापडला तर चंदन सापडणार नाही" असे दाखविण्यात आले आहे.

परंतु, कर्नाटकातील यंत्रणांचा 'डोळा' चुकवून आलेला 'पुष्पा' चंदनासह पोलिसांच्या जाळ्यात सापडला आणि तेथील कोंडा रेड्डी म्हणजेच 'शाहबाज' नामक तस्कराचे भिंग फुटले आहे. त्यामुळे या तस्करासह कर्नाटकातील अन्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

चोरट्यांनी पोलिस मुख्यालयदेखील सोडले नव्हते

पूर्वी चोरट्यांनी शेतकर्‍यांचे बांध अन् बांध पिंजून काढून चंदनाची झाडे तोडण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी पोलिस मुख्यालयात देखील चंदनाची झाडे असल्याची खबर या चोरट्यांना मिळाली. अन् त्यांनी पोलिस मुख्यालयातीलच झाडे तोडण्याची योजना आखली. मध्यरात्री पोलिस अधीक्षकांचे निवासस्थान गाठले आणि झाडे तोडण्यास सुरुवात केली. मात्र, हा डाव फसला.

वीरप्पननेदेखील मिरजेचा केला होता वापर

वीरप्पन याने सन 1994-95 मध्ये तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मार्गे विदेशात पळून जाण्यासाठी मिरजेत येऊन मुक्काम केला होता. परंतु, या पाच राज्यांतील पोलिस त्याच्यामागे हात धुवून लागल्याने त्याने मिरजेतून अथणीमार्गे पुन्हा पलायन केले होते. त्यामुळे मिरजेचा वापर हा चंदन तस्करीसोबत कुख्यात वीरप्पन यानेदेखील विदेशात पळून जाण्यासाठी केला होता. त्यामुळे चंदन तस्करीबाबतीत मिरज नेहमीच चर्चेत राहिले आहे.

आडवळणी 'मिरजे'चाच वापर कशासाठी?

बंगळूरमधून कोल्हापुरात तस्करी करण्यासाठी थेट मार्ग आहे. परंतु हा 'पुष्पा' रक्तचंदनाने भरलेला टेम्पो घेऊन आडवळणी असलेल्या मिरजमार्गे का आला? त्याला कुणाची नजर चुकवायची होती? की कुणाची टक्केवारी चुकविण्यासाठी त्याने मिरजेचा वापर केला? आपला टक्का चुकतो याची कुणकुण कदाचित संबंधिताला लागली असणार आणि तेथेच पाल चुकचुकली असणार. त्याचा आवाज मिरज पोलिसांना आल्याने ही कारवाई झाली असण्याची शक्यता आहे.

चिन्यांचा डोळा भारतातील रक्तचंदनावर

चीनमध्ये रक्तचंदनापासून बनविण्यात आलेल्या फर्निचरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी चीन वाटेल तितके पैसे मोजायला तयार असतो. भारतातील शेशाचलममध्ये आढळणार्‍या रक्तचंदनाला चीनमधून मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यासाठी चीन हा भारतातील सिंडीकेटच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT