IPL 2024

MI vs RCB : सलग दुसर्‍या विजयाचे लक्ष्य; मुंबई इंडियन्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी सामना

Shambhuraj Pachindre

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : 'आयपीएल 2024' हंगामात घरच्या मैदानावर गुरुवारी (11 एप्रिल) मुंबई इंडियन्सनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दोन हात करताना सलग दुसर्‍या विजयाचे लक्ष्य ठेवले आहे. (MI vs RCB)

होमग्राऊंड वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात यजमानांना राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. माजी विजेत्यांवर सलग तिसरा सामना हरण्याची नामुष्की ओढवली. मात्र, गेल्या रविवारी दिल्ली कॅपिटल्सवर मात करताना त्यांनी विजयारंभ केला. त्यानंतर मुंबई इंडियन्सकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे घरच्या पाठिराख्यांसमोर सलग तिसरा सामना खेळताना हार्दिक पंड्या आणि सहकार्‍यांसमोर सातत्य राखण्याचे आव्हान आहे. (MI vs RCB)

बहरलेली फलंदाजी हे मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. रोहित शर्मा आणि इशान किशन या बिनीच्या जोडीसह कर्णधार हार्दिकला सूर गवसला. मात्र, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा अपयशी ठरल्यानंतर टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्ड यांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांची केलेली धुलाई निर्णायक ठरली. या दोघांचा फॉर्म पाहता मधली फळी अधिक मजबूत झाली आहे.

मध्यमगती गोलंदाज जेराल्ड कोएत्झीने अचूक मारा करताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चांगली साथ दिली. त्याच्यासह आकाश मधवाल आणि अष्टपैलू रोमारिओ शेफर्डकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला यंदाच्या 'आयपीएल' मोसमाची दमदार सुरुवात करता आलेली नाही. त्यांना 5 पैकी एकच सामना जिंकता आला आहे. त्यात सलग तीन पराभवांचा समावेश आहे. त्यांच्यासमोर पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान आहे. माजी कर्णधार आणि प्रमुख फलंदाज विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक ठोकले. मात्र, त्याची खेळी व्यर्थ ठरली. कर्णधार प्लेसिससोबतच्या शतकी सलामीनंतरही अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने बेंगळुरूची मजल दोनशेपार गेली नाही. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने उठवला.

किंग कोहलीचा फॉर्म पाहुण्यांसाठी जमेची बाजू ठरू शकते. पाच महिन्यांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील (50 वे एकदिवसीय शतक) सेंच्युरीच्या आठवणी अजूनही ताज्या असल्याने गुरुवारी त्याच मैदानावर आणखी एका विराट खेळीसाठी तो उत्सुक असेल. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची गोलंदाजी अद्याप बहरलेली नाही. ग्लेन मॅक्सवेल या पार्टटाईम बॉलरने थोडा प्रभावी मारा केला आहे; पण तो फलंदाजीत फ्लॉप ठरतो आहे.

संघ यातून निवडणार

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन (यष्टिरक्षक), अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, एन. तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वूड.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत (यष्टिरक्षक), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विशक, दिनेश कार्तिक, करण शर्मा, रिस टोपले, टॉम कुरेन, स्वप्निल सिंह, लॉकी फर्ग्युसन, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, सुयश प्रभुदेसाई, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT