आचारसंहिता, निवडणूक खर्चाबाबत निरिक्षकांची उमेदवारांसोबत बैठक | पुढारी

आचारसंहिता, निवडणूक खर्चाबाबत निरिक्षकांची उमेदवारांसोबत बैठक

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसोबत निवडणूक निरिक्षकांनी बैठक घेतली. यावेळी उमेदवारांना खर्चविषयक बाबींचा लेखा, आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यात आली. निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी उमेदवारांची सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीला सामान्य निरिक्षक एम.मल्लिकार्जुन नायक, खर्च निरिक्षक प्रमोद कुमार वर्मा, पोलिस निरीक्षक बरिंदरजीत सिंह, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर व उमेदवार तथा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उमेदवाराने आपल्या खर्चाचा हिशोब अचूकपणे आयोगास सादर करावयाचा असतो. त्यासाठी आयोगाच्या दिशानिर्देशाची माहिती यावेळी देण्यात आली. उमेदवारास सर्व खर्च नव्याने उघडलेल्या बँक खात्यातूनच करावयाचा असून प्राप्त रक्कमा व खर्च याचा ताळमेळ, लेखा कशा पद्धतीने ठेवावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन होणे फार महत्वाचे आहे. प्रचारादरम्यान कुठेही त्याचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यासोबतच प्रत्येक गोष्ट विहित मार्गाने परवानगी घेऊनच करावी, असे यावेळी जिल्हाधिकारी डाँ.आशिया यांनी सांगितले. विविध परवानगीसाठी आँनलाईन सुविधेचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाने सुरु केलेल्या सी-व्हिजील अँपची माहिती देखील यावेळी उमेदवारांना देण्यात आली.
सामान्य निरिक्षक एम.मल्लिकार्जुन नायक यांनी निवडणूक चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी उमेदवारांनी आयोगास सहकार्य करण्याचे आवाहन केले. आदर्श आचारसंहिता व खर्च विषयक बाबींसंदर्भात तक्रारी असल्यास सी-व्हिजीलवर नोंदवाव्या, असे खर्च निरिक्षक प्रमोद कुमार वर्मा यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक बरिंदरजीत सिंह यांनी देखील उमेदवार व प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.

Back to top button