मुंबई : वृत्तसंस्था सलग सहा पराभव पत्करावे लागल्याने स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या मुंबई इंडियन्स संघ गुरुवारी (दि.21) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजय मिळवून आयपीएल-2022 मधील आपले आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणार्या मुंबई इंडियन्सने या सत्रात एकही सामना जिंकलेला नाही. यामळे चेन्नईविरुद्धही पराभव पत्करल्यास रोहित सेना स्पर्धेतून बाहेर पडेल. (MI VS CSK)
विद्यमान विजेत्या चेन्नई सुपर किंग्जची स्थितीही काही चांगली नाही. गुणतक्त्यात मुंबई दहाव्या, तर चेन्नई नवव्या स्थानावर आहेे. चेन्नईलाही पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे मुंबईविरुद्ध पराभव पत्करल्यास चेन्नईसुद्धा स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचणार आहे. (MI VS CSK)
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने या सत्रात आतापर्यंत आपल्या खराब कामगिरीने निराशच केले आहे. प्रत्येक सामन्यात अपयशी ठरलेल्या पोलार्डने केवळ 82 धावा काढल्या आहेत. यामुळे कागदावर भक्कम असलेल्या मुंबईला विजय मिळविण्यासाठी चेन्नईच्या कमी अनुभव असलेल्या गोलंदाजीवर प्रहार करावा लागेल. (MI VS CSK)
मुंबईला फलंदाजीबरोबरच सुमार गोलंदाजीही सतावत आहे. अनुभवी बुमराह वगळता अन्य गोलंदाजांनी निराशाच केली आहे. त्यामुळे टायमल मिल्स, जयदेव उनादकट, बासिल थंपी व फिरकी गोलंदाज एम. मुरुगन यांना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून मुंबईला यश मिळवून द्यावे लागेल. (MI VS CSK)
एकूण सामने 32
मुंबई विजयी 19
चेन्नई विजयी 13