प्रसाद जगताप
पुणे : मेट्रो ट्रेनची सेवा पुण्यातून काही दिवसांतच सुरू होणार आहे. त्यात असंख्य प्रवासी ये-जा करणार आहेत. त्यामुळे मेट्रोची ही ट्रेन प्रवाशांची ये-जा आणि वातावरणातील धूलिकणांमुळे नक्कीच अस्वच्छ होणार, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. पण महामेट्रो प्रशासनाने अवघ्या 3 मिनिटांत संपूर्ण मेट्रो ट्रेन चकाचक करणारी यंत्रणाच उभी केली आहे. त्यामुळे दिवसभर मेट्रो ट्रेन कितीही खराब झाली, तरी ती फक्त तीन मिनिटांत स्वच्छ करता येणार आहे.
येत्या मार्च महिन्यातच गरवारे मेट्रो स्थानक ते हिल व्ह्यू पार्क (वनाज) स्थानकापर्यंत पुणेकरांना मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रोची गरवारे महाविद्यालय ते वनाजपर्यंत चाचणी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून, या मार्गावरील सर्व स्टेशनची पायाभूत सुविधांची कामे देखील पूर्ण झाली आहेत. मेट्रो प्रशासनाला सीएमआरएस सर्टिफिकेशनचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करता येणार आहे.
प्रवासी सेवा पुरविताना दिवसाच्या अनेक फेर्या होतात. परिणामी, खिडक्यांच्या काचेवर धूळ जमा होत असते. ती स्वच्छ करणे आवश्यक असते. त्यासाठी आधुनिक पध्दतीचा कोच वॉशिंग प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटमध्ये पाण्याची बचत होणार असून, अवघ्या ती मिनिटांत संपूर्ण मेट्रो ट्रेन स्वच्छ होणार आहे.
– हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो