नागपूर; पुढारी वृत्तसेवा नागपुरात पावसाने हाहाकार माजवला आहे. काल (शुक्रवार) मध्यरात्री दोननंतर विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश धो-धो पावसानं नागपूरकरांचा काही काळ अक्षरशः थरकाप उडविला. विजांचा कडकडाट असा काही होता की, शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले. निम्म्या नागपूर शहराचा वीज पुरवठा खंडित झाला. अवघ्या काही तासांतच शहरात ११६.५ मि.मी. पाऊस बसरल्याची माहिती हवामान खात्याच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने दिली.
विजांच्या कडकडाटामुळे इमारतींना हादरे बसत होते. कानठळ्या बसवणाऱ्या वीजांच्या आवाजाने जागे झालेले लोक अक्षरशः जीव मुठीत धरून निसर्गाचं हे रौद्ररुप भेदरलेल्या नजरेनं बघत होते. रस्ते जलमय झाले होते. सकाळी बेसा, ओंकारनगर, नंदनवन, सीताबर्डी, धंतोली, प्रतापनगरसह अनेक वस्त्यांमधील रस्त्यांना, नाल्याना नदीचे स्वरुप आले होते. सीताबर्डीवरील मोरभवन बसस्थानकावर उभ्या बसगाड्या, इतर अनेक वस्त्यांमध्ये रस्त्यावर उभ्या कार व इतर वाहने पाण्यात बुडाल्याचे चित्र दिसून आले.
शहरातील आपात्कालीन नियंत्रण कक्षात रात्रीपासूनच फोन सुरु झाल्याने यंत्रणा सतर्क झाली. पहाट होताच अनेक ठिकाणी रस्त्यांवर बोटी दिसू लागल्या. सकाळीच स्वतः जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त व त्यांची यंत्रणा कामी लागली. आपत्ती व्यवस्थापन, नाले सफाईचा या पावसाने बोजवारा उडवला. आज सकाळी तर रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. महालक्ष्मी पूजन निमित्ताने घरोघरी नातेवाईक असल्याने मोठी गैरसोय झाली.
सिमेंटच्या उंचच उंच रस्त्यांमुळे खोलगट भागातील घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे लोकांपुढे मोठे संकट निर्माण झाले. अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना बोटीनं रेस्क्यू करावे लागले. त्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. घरात पाणी शिरल्यावर घरात एकटेच असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे बेहाल झाल्याचे दिसून आले. लोखंडी पूल, नरेंद्र नगर अंडरब्रिज नेहमीप्रमाणे तुडूंब भरल्याने वाहतुकीसाठी बंद झाला होता. नाग नदीच्या समांतर असलेला ग्रेटनाग रोड देखील बराच काळ वाहतुकीसाठी बंद होता. विशेषतः रेल्वे पुलाच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्यातून वाहन काढणं वाहनधारकांना अशक्य होत होते. अनेकांनी दूरचा मार्ग स्वीकारला.
शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना आज (शनिवार) सुटी जाहीर केली. दरम्यान, शुक्रवारच्या ऑरेंज अलर्टनंतर आज शनिवारीही विदर्भाच्या बहुतांशी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
रेल्वेस्थानक, बसस्थानक जलमय
आजच्या पावसाचा तडाखा इतका जबरदस्त होता की, मध्यवर्ती रेल्वेस्थानकाला देखील नदीचे स्वरुप आले होते. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मोरभवन, गणेशपेठे बसस्थानकावर देखील हीच परिस्थिती होती.
हेही वाचा :