Latest

Manoj Jarange Patil- Maratha Reservation | ब्रेकिंग! मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा, दुपारी २ वाजता भूमिका जाहीर करणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्त्वाखाली लाखोंच्या संख्येने निघालेले मराठा समाजाचे वादळ आज शनिवारी (दि. २६) वाशीत पोहोचले. दरम्यान, वाशी येथील शिवाजी चौकातील सभेत जरांगे पाटील आज दुपारी २ वाजता मराठा आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार आहेत. (Maratha Reservation) या ठिकाणी मराठ्यांचा जनसागर उसळला आहे. यावेळी जरांगे पाटील सरकारच्या नव्या जीआरवर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारने आपल्याला काही कागदपत्रे दिली आहेत. सरकारने दिलेल्या कागदपत्रांवर आपल्याला चर्चा करायची आहे. आता रिकामे माघारी जायचे नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांना उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी २ वाजता बोलणार असल्याचे सांगितले आहे. मराठा समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कालपासून सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करत आहे. काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी लोणावळ्यात चर्चा केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात १० मिनिटे सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते.

आंदोलनाला सर्वांना अधिकार आहे. पण ते शांततेच्या मार्गाने झाले पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. माझा आरक्षणाला पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार
यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी विजयोत्सवासाठी स्वतः यावे. आज आझाद मैदानात गुलाल उधणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्यास पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावून मनाई केली आहे. त्यांना नवी मुंबई, खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्कवर उपोषण करण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. मात्र, जरांगे हे आझाद मैदानावरच उपोषण करण्यावर ठाम असून, मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनीही तशी तयारी सुरू केली आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT