पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Violence : मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेतील पीडितेने आरोप केले आहेत की पोलिस स्वतःच त्या जमावासोबत होते. पोलिसांनीच आम्हाला त्या रस्त्यावर जमावासोबत नेऊन सोडले, अशी धक्कादायक माहिती पीडितेने सांगितली आहे. इंडियन एक्सप्रेसने व्हिडिओतील पीडित महिलेकडून फोनवरून प्रत्यक्ष घटनेची माहिती घेतली. यावेळी पीडितेने ही धक्कादायक माहिती उघड केली.
मणिपूर मागील दोन महिन्यांपासून अधिक काळ हिंसाचारात होरपळत आहे. मणिपूर राज्यात संतापजनक आणि मानवतेला अत्यंत लाजिरवाणी करणारी घटना समोर आली आहे. राज्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचे दिसते. तसेच तिच्यावर बलात्कार करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. Manipur Violence
व्हिडिओतील दोन महिलेपैकी एकीचे वय 20 आणि दुसरीचे 40 आहे. पुरुषांच्या जमावाने दोन्ही महिलांना रस्त्यावर आणि शेताकडे नग्नपणे चालण्यास भाग पाडले. तर काही पुरुष या दोन्ही महिलांना जबरदस्तीने ओढून शेताकडे खेचताना व्हिडिओत दिसतात.
18 मे रोजी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी भरदिवसा महिलांवर क्रूरपणे सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. पोलिसांच्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, कांगपोकपी जिल्ह्यातील त्यांच्या गावावर जमावाने हल्ला केल्यावर ते जंगलात आश्रयासाठी पळून गेले होते. नंतर थौबल पोलिसांनी त्यांची सुटका केली आणि त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पण वाटेत त्यांना जमावाने अडवले. ते देखील पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असताना जमावाने अडवले आणि पोलिसांच्या ताब्यातून घेतले.
मात्र इंडियन एक्सप्रेसने तिच्या पतीच्या घरून तिच्याशी फोनवर माहिती घेतली यावेळी तरुण महिलेने पोलिसांवर आरोप केला आहे. पीडितेने म्हटले की, पोलिस आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जमावासोबत होते. पोलिसांनी आम्हाला घराजवळून उचलले आणि गावापासून थोडे दूर नेले आणि जमावासोबत रस्त्यावर सोडले. आम्हाला पोलिसांनीच त्यांच्या तावडीत दिले.
पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितले होते की त्यांच्यापैकी 5 जण तिथे एकत्र होते. व्हिडिओत दिसणाऱ्या दोन महिला आणि आणखी एक 50 वर्षीय महिला जिला कथितरित्या विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती आणि 20 वर्षीय पीडितेचे वडील आणि भाऊ, असे ते पाच जण होते. पैकी वडील आणि भावाला जमावाने ठार मारले. जेव्हा सर्व पुरुष मारले गेले आणि जमावाने आमच्यासोबत जे केले त्यानंतर आम्हाला तिथेच सोडून दिले त्यानंतर आम्ही तेथून निघून स्वतःची सुटका करून घेतली.
पुढे ती म्हणाली की तिला आणि तिच्या कुटुंबाला या घटनेचा व्हिडिओ कॅप्चर केल्याची माहिती नव्हती. पीडित महिला पुढे म्हणाली, मणिपूरमध्ये इंटरनेट नाही, आम्हाला माहित नाही. ती म्हणाली जमावात अनेक पुरुष आहेत त्यांच्यापैकी काहींना ती ओळखू शकते. धक्कादायक म्हणजे या जमावातील एक जण तिच्या भावाचा मित्र आहे, अशी माहिती तिने दिली.
हे ही वाचा :