Latest

खास चोरीसाठी औरंगाबादवरुन यायचा; उच्च शिक्षित तरूणाच्या युट्युब पाहून पुण्यात घरफोड्या

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा:

नोकरी गेल्यानंतर झटपट पैसा कमविण्यासाठी युट्युबवर घरफोडी करण्याचे व्हिडीओ पाहून औरंगाबाद येथून पुण्यात येऊन उच्च शिक्षित तरूणाने घरफोड्या केल्याचा धक्कादायक प्रकार फरासखाना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत उघड केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 7 लॅपटॉप, एक दुचाकी, सोन्या – चांदीचे दागिने असा एकूण 9 लाख 65 हजारांचा ऐवज जप्त करताना घरफोडीचे पाच गुन्हे उघड केले आहेत. प्रज्वल गणेश वानखेडे उर्फ रेवणन्नाथ (25,रा. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात:

9 मे रोजी कसबा पेठेतील ओमकार कृपा सहकारी सोसायटीत घरफोडीचा प्रकार घडला होता. याबाबत सागर वैैलास भोसले (37) यांनी फिर्याद दिली होती. यानुसार फरासखाना पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. त्याचा तपास केला असता तो व्यक्ती नाना पेठेतील हॉटेल रॉयल इनक्वेव्हमध्ये जाताना दिसला. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून 11 मे रोजी संशयित आरोपी वानखेडे याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता एक लॅपटॉप, 2 मोबाईल, एक राऊटर, एक कटर, चांदीचे दागिने असा 1 लाख 74 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपी वानखेडे याला अटक करून आणखी तपास केला असता त्याने फरासखानासह भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले.

प्रज्वल गणेश वानखेडेकडून घरफोडीतील 9 लाख 65 हजार रुपयांचे सोन्या – चांदीचे दागिने, 7 लॅपटॉप, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, सुशील बोबडे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अंमलदार समीर माळवदकर, अभिनय चौधरी, मेहबुब मोकाशी, राकेश क्षीरसागर यांच्या पथकाने केली.

आरोपी वानखेडे हा उच्चशिक्षीत असून त्याच्याकडे एमसीए (सॉफ्टवेअर) ही पदवी आहे. त्याने औरंगाबाद येथे उच्चशिक्षण घेतले आहे. तो अविवाहित असून औरंगाबाद येथील टोल नाक्यावर मॅनेजर म्हणून पूर्वी काम करत होता. त्याची नोकरी गेल्यानंतर त्याने घरफोडी गुन्हे सुरु केले. औरंगाबाद येथून पुण्यात येऊन लॉजवर राहत असे. पुण्यातील वेगवेगळया भागात फिरुन घर बंद असलेली घरे हेरुन त्यात तो घरफोडी करत होता. कोणाला संशय येऊ नये याकरिता तो सोसायटीच्या वॉचमनला वाय-फायवाला, केबलवाला असल्याचे सांगुन सोसायटीतील फ्लॅट कटरच्या सहाय्याने फोडत असे.                                   – राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT