पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी माझ्यावर गंभीर आरोप केला आहे. हा आरोप सिद्ध झाल्यास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज ( दि. १९ ) स्पष्ट केले.
तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वारंवार फोन केला. पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली होती, असा आरोप भाजप नेता सुवेंदु अधिकारी यांनी केला. मंगळवार १८ एप्रिल रोजी हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथील सभेत ते बोलत होते. निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता. यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मी फोन केल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी सर्व आरोप फेटाळले. एखाद्या राजकीय पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निवडणूक आयोगाच्या समितीचा असतो. पक्षाचे नाव अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच राहील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सध्या केंद्रात भाजप सत्तेत आहे, त्यामुळे या पक्षाचा मनमानी कारभार सूरु आहे; पण सत्ता ही तात्पुरती असते, खुर्ची येते आणि जाते; पण लोकशाही कायम राहते हे त्यांना समजत नाही. संविधान कायम राहील, काही दुरुस्त्या होऊ शकतात; पण भारतीय संविधानाला कोणीही संपवू शकत नाही. तसेच आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप २००जागांचा आकडा पार करू शकणार नाही, असा दावा बॅनर्जी यांनी केला.
मुकुल रॉय हे भाजपचे आमदार आहेत. त्याचा मुलगा सुभ्रांशु याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. आमच्यासाठी हा एक शुल्लक मुद्दा आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :