पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात दरवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून, यंदा हिवतापाचे रुग्ण कमी झाले आहेत. डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत मात्र वाढ झाली आहे. पावसाळ्यातील वातावरण विषाणूवाढीसाठी पोषक असते. त्यामुळे या काळात कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते.
पावसाचे पाणी, साठलेले पाणी, यामध्ये डासांची पैदास होते आणि त्यातून प्रादुर्भाव वाढतो. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने कीटकजन्य आजारांचे प्रमाण घटेल, असा कीटकतज्ज्ञांचा अंदाज होता. मात्र, रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप म्हणाले, यंदा पावसामध्ये सातत्य नसले, तरी थांबून थांबून पडत आहे. त्यामुळे पाणी साचतेच आणि डासोत्पत्ती स्थानेही निर्माण होतात. त्यामुळे कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते. बरेचदा वर्षभर पाऊस पडत असल्याने जानेवारी-फेब्रुवारीतही कीटकजन्य आजारांचे रुग्ण सापडतात. विदर्भातही रुग्णसंख्या मोठी आहे.
तपासण्या आणि त्यातून निदान झालेल्या रुग्णांवरून कोणत्या भागात आजारांचा प्रादुर्भाव जास्त आहे, हे समजते आणि त्यानुसार उपाययोजना करता येतात. कोरोना काळातही आपण तपासण्यांची संख्या वाढविल्याने जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना बरे करणे शक्य झाले.
– डॉ. महेंद्र जगताप,
राज्य कीटकशास्त्रज्ञ, आरोग्य विभाग
काय काळजी घ्यावी?
- घरातील, परिसरातील पाणीसाठे वाहते करावेत.
- साठविलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत.
- दहा घरांपैकी एका घरात अळ्या आढळून आल्या, तरी साथ समजली जाते. त्यामुळे आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
- दिवसा पूर्ण कपडे वापरावेत. रात्री मच्छरदाणीचा वापर करावा.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.