पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातील पळवलेल्या उद्योगांचा मोठा वाटा आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आज केला . दिल्ली महापालिका, गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. या वेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रातील उद्योग पळवले गेले. आता महाराष्ट्रातील गावेही पळवतात का? असा प्रश्न पडू लागला आहे. सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना सुरू आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर कानडी अत्याचार होत आहेत. या महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात सर्व महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र येणे गरजेचे आहे. १७ डिसेंबरला महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात मुंबईतील महामोर्चात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनीया वेळी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राच्या दबावामुळे गप्प आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
१०६ हुताम्यांनी महाराष्ट्राची निर्मिती झाली. सातत्यांने शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे. १७ तारखेचा मोर्चा महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान भाजपकडून मुद्दाम करण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी १७ डिसेंबरचा महामोर्चा आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रावादीच्या खासदारांनी संसदेत याबद्दल भूमिका मांडली आहे. कर्नाटककडून शांततेचे आव्हान करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री अस काही बोलतात की शांतते ऐवजी भडकाच उडतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज प्रक्षोभक भाषणे करतात, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.