Ajit Pawar Last Phone Call Pudhari
महाराष्ट्र

Ajit Pawar Last Phone Call: अजित पवारांनी शेवटचा फोन कोणाला केला होता? त्यांचे शेवटचे शब्द काय होते? निधनापूर्वीचा संवाद समोर

Ajit Pawar Last Phone Call: अजित पवारांच्या विमान अपघातापूर्वीचे शेवटचे फोन रेकॉर्डिंग समोर आले असून, त्यात त्यांनी "आपण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे आहोत" असा सामाजिक सलोख्याचा संदेश दिला आहे.

Rahul Shelke

Ajit Pawar Last Phone Call: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य अजूनही धक्क्यात आहे. विमान अपघातापूर्वी अजित पवारांनी नक्की कोणाशी संवाद साधला होता आणि त्यांचे शेवटचे शब्द काय होते, याबाबतची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्या शेवटच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग समोर आले असून, आपल्या अखेरच्या क्षणीही ते जनसेवेचा आणि सामाजिक सलोख्याचा विचार करत होते, हे यातून दिसून येत आहे.

नक्की काय घडलं?

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कामासाठी अजित पवार विमानाने बारामतीकडे येत होते. लँडिंगच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या काही वेळ आधी, म्हणजेच सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना फोन केला होता. श्रीजीत यांनी एका विशिष्ट समाजाला उमेदवारी देण्याबाबत दादांना मेसेज केला होता, त्याला उत्तर देण्यासाठी दादांनी विमानातूनच त्यांना संपर्क साधला.

शेवटचा संवाद काय होता?

श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे रेकॉर्डिंग जाहीर केले आहे.

  • अजित पवार: "माहिती नसतं, काही नसतं.. उगीच काहीतरी करायचं. आम्ही सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे आहोत बाळा..."

  • श्रीजीत पवार: "अजितदादा, मला जे वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं."

  • अजित पवार: "मान्य आहे, पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी आधीच दिलेली आहे. तिथे ओबीसींचं आरक्षण होतं. इतर पक्षांनी दुसरे उमेदवार दिलेत, पण आपण आपलं काम चोख केलंय."

"शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसमावेशक विचार"

श्रीजीत पवार हे रेकॉर्डिंग ऐकवताना भावूक झाले होते. ते म्हणाले, "दादांना कोणीही मेसेज केला तरी ते त्याचे उत्तर द्यायचे. विमान प्रवासात असतानाही त्यांनी माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी फोन केला. जगाला कळावं की हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा होता, म्हणूनच मी हे रेकॉर्डिंग समोर आणलं आहे."

अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे. त्यांनी नुकतीच शपथ घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच दौऱ्यात त्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि या अपघातात प्राण गमावलेल्या विदिप जाधव यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

दुसरीकडे, हा अपघात होता की घातपात? असा संशय काही नेत्यांनी व्यक्त केला असून त्याचा तपास सुरू आहे. मात्र, समोर आलेल्या या शेवटच्या फोन कॉलमुळे अजित पवारांच्या कामाची चर्चा पुन्हा एकदा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT