Yavatmal Residential Colony Security Guard Killed
यवतमाळ : वणी परिसरातील वेकोलिच्या प्रगतीनगर निवासी वसाहतीत सुरक्षा रक्षकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवार दि. 31 ऑक्टोंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास उपक्षेत्रीय प्रबंधक यांच्या कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या 45 वर्षीय सुरक्षा रक्षकावर अनओळखी व्यक्तीने हल्ला करून त्याचा खून केला. या घटनेमुळे वेकोलि वर्तुळासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वणी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणींमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्यांसाठी विविध निवासी वसाहती उभारण्यात आल्या आहेत. याच वसाहतींमध्ये वेकोलिच्या अधिकार्यांची कार्यालयेही आहेत. प्रगतीनगर येथील उपक्षेत्रीय प्रबंधक यांच्या कार्यालयात ओमप्रकाश हरी प्रसाद नामक सुरक्षा रक्षक रात्रीच्या सुमारास नियमित कर्तव्य बजावत होता.
दरम्यान, रात्री 11 वाजताच्या सुमारास एकाने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत. कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, हल्लेखोर कोण होता, ही हत्या पूर्वनियोजित होती की यामागे अन्य काही कारण आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मात्र, हत्येमागील कारण आणि आरोपीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. वेकोलिच्या निवासी वसाहतीतील कार्यालयातच सुरक्षा रक्षकाचा खून झाल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून हत्येचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.