प्रतिनिधिक छायाचित्र  File Photo
यवतमाळ

यवतमाळ : कालवा फुटल्याने ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Yavatmal News | तांबा येथील मुख्य कालव्यावरील वितरिका फुटली

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : बाभूळगाव तालुक्यातील  तांबा येथील मुख्य कालव्यावर असलेली वितरिका फुटली. यामुळे जवळपास ५० हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा ही पिके पाण्याखाली बुडाली आहे. वितरिकेजवळच्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेली आहे. वितरिका फुटणार याची माहिती शेतकऱ्यांनी बेंबळा प्रकल्प कालवे विभागाला दिली होती. याकडे दुर्लक्ष केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

बाभूळगाव, कळंब या दोन तालुक्यांमध्ये जात असलेल्या बेंबळा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यावर तांबा येथे वितरिका आहे. ही वितरिका १० जानेवारीच्या रात्री फुटली. त्यामुळे लगतच्या शेतात पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. वितरिका फुटल्याची माहिती देऊनही प्रकल्पातील पाण्याचा प्रवाह शनिवारी दुपारपर्यंत बंद करण्यात आला नव्हता या वितरिकेमध्ये पाणी सोडण्याचा नियोजित दिवस १२ जानेवारी होता. त्यापूर्वीच १० जानेवारीला पाणी सोडण्यात आले. याची पूर्वसूचना स्थानिक कालवा निरीक्षकाला देण्यात आली नाही. त्यामुळे गेट बंद केले गेले नाही, परिणामी पाण्याचा सर्व प्रवाह तांबा वितरिकेत शिरला. ज्या ठिकाणी ही वितरिका फुटणार अशी माहिती कालवे विभागाला दिली होती, तेथे वेळीच काम झाले असते तर आजची स्थिती निर्माण झाली नसती, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

वितरिका फुटल्यामुळे कोठा येथील शेतकरी विठ्ठलराव खसाळे यांचे संपूर्ण तीन एकर शेत वाहून गेले, राहुल कदम, अजय कदम, विठ्ठल खसाळे, पांडुरंग घिये, राजेश्वर उघडे, चंद्रशेखर जंगठे, सदानंद रामटेके, आशा कदम, गोपाल गोरे यांच्यासह इतरही शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आहे. जवळपास ५० ते ६० हेक्टर पिकाला या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हाती आलेला घास जाण्याची अवस्था आहे. वितरिका दुरुस्त न झाल्यास २०० हेक्टरवरचे पीक करपण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT