fraud News  File Photo
यवतमाळ

Yavatmal News | केदारनाथ दर्शनाचे आमिष दाखवून यवतमाळमधील १२ भाविकांची ६ लाखांची फसवणूक

पांढरकवडा पोलिसांत मुंबईतील 'वंडरलस्ट एक्सप्लोरर्स' ट्रॅव्हल कंपनीच्या संचालिकेवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Kedarnath Yatra Pilgrims Cheated

यवतमाळ : केदारनाथ दर्शनाचे आमिष दाखवून पांढरकवडातील एका व्यापाऱ्यासह १२ भाविकांची ५ लाख ७२ हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी मुंबईतील 'वंडरलस्ट एक्सप्लोरर्स' ट्रॅव्हल कंपनीच्या संचालिकेवर गुन्हा दाखल केला आहे.

शास्त्रीनगर येथील रहिवासी राजेश शंकर कैलासवार (वय ५१) यांनी आपल्या १२ सहकाऱ्यांसोबत केदारनाथ यात्रेचे नियोजन केले होते. यात्रेसाठी त्यांनी मीरा रोड (मुंबई) येथील 'वंडरलस्ट एक्सप्लोरर्स' या कंपनीच्या संचालिका कादंबरी महेंद्र देवल यांच्याशी संपर्क साधला होता. कादंबरी देवल यांनी भाविकांच्या या गटाला नागपूर ते दिल्ली विमान प्रवास, तेथून केदारनाथसाठी खासगी बस आणि मंदिर दर्शनासाठी हेलिकॉप्टर बुकिंग करून देण्याचे आश्वासन दिले होते.

या प्रवासासाठी कैलासवार यांनी एकूण ५ लाख ७२ हजार रुपये कादंबरी देवल बँक खात्यात जमा केले. मात्र, प्रवासाची तारीख जवळ येऊनही ट्रॅव्हल कंपनीकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. जेव्हा कैलासवार यांनी विचारणा केली, तेव्हा 'युद्धजन्य परिस्थिती असल्याचे सांगून यात्रा रद्द झाल्याचे भासवले आणि भाविकांची दिशाभूल केली.

या संदर्भात राजेश कैलासवार यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कादंबरी महेंद्र देवल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT