यवतमाळ : आर्णी तालुक्यातील शेलू (ब्राह्मणवाडा) येथील मूळ रहिवासी व सध्या यवतमाळ येथे वास्तव्यास असणारे रवींद्र वाकोडे आणि सोनाली वाकोडे यांचा एकुलता एक मुलगा साहिल रवींद्र वाकोडे (वय १९) याने मुंबई येथे जीवन संपविले. आज (रविवारी) त्याचा मृतदेह यवतमाळमधील समतानगर येथील निवासस्थानी आणण्यात आला. त्यानंतर वडगाव येथील मोक्षधामात शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साहिल हा आयआयटीचा हुशार विद्यार्थी होता. मात्र, महाविद्यालयीन परिसरात त्याला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते आणि शिक्षक त्याला सातत्याने अपमानास्पद वागणूक देत होते, असा गंभीर आरोप पालकांनी केला असून घातपाताचा संशयही व्यक्त केला आहे.
साहिलचे वडील रवींद्र वाकोडे हे फुलसावंगी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत, तर आई सोनाली वाकोडे (मुनेश्वर) या नाईकनगर हेटी येथील शिवाजीराव मोघे उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षिका आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने सीआयडीमार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी करावी आणि साहिलला हे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी शोकसागरात बुडालेल्या कुटुंबीयांनी केली आहे.