यवतमाळ : दिवाळी सणासाठी माहेरी आलेल्या एका विवाहितेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथे बुधवार (दि.२२) सायंकाळी ६ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. बुधवारी सर्वत्र गायगोधनची धामधूम असताना ही दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील अर्चना संजय आत्राम (वय ३०) हिचा पारवा (ता. घाटंजी) येथील तरुणाशी विवाह झाला होता. पती कंपनीत कामाला असल्याने आणि सुटी न मिळाल्याने अर्चना दिवाळीसाठी माहेरी पेंढरी येथे आली होती. दरम्यान, बुधवारी घरातील मंडळी शेतात गेली होती. यावेळी दोघी बहिणीच घरी होत्या. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अर्चना मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी स्वीच सुरू करायला गेली असता तिला विजेचा शॉक लागला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर वीजपुरवठा बंद करून कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला.