यवतमाळ : मुलगा एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला आणि तिला पळवून नेले. सूडाच्या आगीत पेटलेल्या विवाहितेचा नवऱ्याने पत्नीला पळवून नेणाऱ्या युवकाच्या वडिलांचा खून केला आणि एका क्षणात दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. हृदय पिळवून टाकणाऱ्या या घटनेने वणी व शिरपूर परिसर हादरून गेला आहे.
प्रिया तिरणकर हिचा भाऊ एका विवाहित महिलेला म्हणजेच आरोपी निलेश ढोले (रा. सुमठाणा, ता. भद्रावती) याच्या पत्नीला पळवून घेऊन गेला. गावकऱ्यांच्या कुजबुजीने, अपमानाने आणि घर उद्ध्वस्त झाल्याच्या वेदनेने पेटलेल्या निलेशच्या मनात सुडाची ठिणगी पडली. तुझ्या भावाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलय, मी त्याच्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या तो सतत देत होता. या भीतीपोटी मुलाचे वृद्ध वडील विनायक कुडमेथे यांनी पत्नीसमवेत भद्रावतीहून वणी तालुक्यातील चिखलगाव येथे आपल्या बहिणीकडे आश्रय घेतला.
५ ऑक्टोबरच्या दुपारी वणीतील गंधारे किराणा दुकानात विनायक कुडमेथे हे आपल्या दहा वर्षांच्या नातवासह सामान खरेदीसाठी गेले होते. त्याचवेळी पांढऱ्या वाहनातून आलेल्या निलेश ढोले आणि त्याच्या साथीदाराने वृद्धाला जबरदस्तीने गाडीत ओढून नेले. ६ ऑक्टोबरच्या सकाळी बेलोरा फाटा परिसरात ग्रामस्थांना एक जखमी, बेशुद्ध पडलेला वृद्ध दिसला. शिरपूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, वणी येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती वृद्धाला मृत घोषित केले.
शिरपूर पोलिसांनी मुलगी प्रिया तिरणकर यांच्या तक्रारीवरून निलेश दिलीप ढोले (वय ४०, रा. सोमठाणा) व त्याच्या साथीदाराविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले असून आरोपींचा कसून शोध घेत आहे. प्राथमिक तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर चिखलगाव व वणी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण आहे.