Yavatmal: Landlord Molests Young Woman; Case Registered
यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत भाड्याने राहणार्या युवतीचा घरमालकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
संजय ढवळे (वय ५५) असे संशयित आरोपी घरमालकाचे नाव आहे. पीडित युवती आपल्या मैत्रिणींसोबत काही महिन्यांपासून त्यांच्या घरी भाड्याने राहात होती. खोलीला रंगकाम करायचे आहे. या बहाण्याने ते मुलीच्या खोलीत गेले. त्यावेळी पीडिता एकटी होती. यावेळी संशयित आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले, अशी पीडितेची तक्रार आहे.
त्यानंतर पीडितेने हा प्रकार मैत्रिणींना सांगितला. संशयित आरोपीने पीडितेला सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह संदेश पाठविल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पीडितेने नंतर हा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर सोमवारी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. आज मंगळवारी उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बन्सल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.