Sangli Crime : पलूसमधील खुनाचा छडा; अल्पवयीन संशयित ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि पलूस पोलिसांची संयुक्त कारवाई
Sangli Crime News
पलूसमधील खुनाचा छडा; अल्पवयीन संशयित ताब्यात
Published on
Updated on

पलूस : येथील नामांकित शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजपे (वय 61) यांच्या निर्घृण खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पलूस पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे. कोणत्याही ठोस पुराव्याअभावी अत्यंत क्लिष्ट असलेला हा गुन्हा पोलिसांनी अवघ्या 48 तासात उघडकीस आणला.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 18 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 8.30 च्या सुमारास गणेश सदन अपार्टमेंट परिसरात ही घटना घडली होती. अज्ञात हल्लेखोराने संजय परांजपे यांच्यावर टोकदार हत्याराने हल्ला केला होता. त्यांच्या चेहरा, मान, गळा आणि डोक्यावर गंभीर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जिन्याखालील स्टोअर रूममध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या घटनेने पलूस परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान घटनास्थळी कोणतेही भौतिक किंवा तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते. सुरुवातीला व्यावसायिक आणि सामाजिक वादाच्यादृष्टीने तपास करण्यात आला, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

शेवटी, पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे एका युवकावर संशय व्यक्त केला. त्याच्या पालकांच्या उपस्थितीत त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित युवकाने दिलेल्या कबुलीनुसार, परांजपे यांच्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून त्याने त्यांना धक्का दिला. त्यात ते खाली पडल्याने जखमी झाले. ही बाब कोणाला कळू नये, या भीतीने त्याने जवळ असलेल्या टोकदार हत्याराने त्यांच्यावर वार करून त्यांचा खून केला. पोलिसांनी मृताचा मोबाईलही या युवकाकडून जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पलूस पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news