मुलीला भेटण्याची इच्छा अपूर्णच; आई-वडील दुचाकीसह पुरात गेले वाहून  file photo
यवतमाळ

Yavatmal Heavy Rain : मुलीला भेटण्याची इच्छा अपूर्णच; आई-वडील दुचाकीसह पुरात गेले वाहून

सिंगरवाडी येथील दुर्दैवी घटना, सोमवारी रात्री धानोरा-सिंगरवाडी जवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : पुसद शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंगरवाडी येथून मुलीला भेटायला गेलेले आई-वडील पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेमुळे मुलीला भेटण्याची इच्छा अपूर्णच राहिली. गावकऱ्यांमार्फत शोधमोहीम सुरू आहे. ही दुर्दैवी घटना सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी रात्री घडली.

मोहन सकरू राठोड (वय ५५) व त्यांची पत्नी सुलोचना राठोड (वय ४७) हे दोघे पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहे. त्यांची मुलगी पुसद तालुक्यातील भंडारी येथे राहते. तिला भेटण्यासाठी ते सोमवारी एमएच २९ क्यु ६९३० क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. त्यांनी सिंगरवाडी-धानोरा गावाला जोडणारा पूल पार केला. परंतु, समोरच्या दुसऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे ते परतले. परंतु परत आल्यानंतर धानोरा-सिंगरवाडी या पुलावरून सुद्धा पाणी वाहत असल्याचे दिसून आले. हाच पूल पार करताना पाण्याच्या प्रवाहामुळे मोहन राठोड व त्यांची पत्नी दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

घटनेची माहिती सिंगरवाडी गावकऱ्यांना होताच त्यांनी घटनास्थळ गाठून शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान त्यांना मोहन व त्यांची पत्नी सुलोचना ज्या दुचाकीने मुलीकडे निघाले होते. ती दुचाकी पुलाच्या खालच्या भागात काही अंतरावर आढळून आली. कुंटुंबीयांमार्फत पुसद ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. यानंतर कर्मचारी व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास पत्नी सुलोचना यांचा मृतदेह सापडला. मात्र, मोहन राठोड यांचा मृतदेह अद्यापही शोध पथकांना मिळालेला नाही. ग्रामीण पोलिस व अग्निशमन दलाची शोधमोहीम सुरू आहे. या दाम्पत्यामागे दोन विवाहित मुले व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेने सिंगरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT