Yavatmal drown incident
यवतमाळ : रेल्वे मार्गावर उड्डाण पुलासाठी तयार केलेल्या खोल खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला. दारव्हा रेल्वे स्टेशनलगत बुधवारी (दि.२०) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे. रेहाण असलम खान (वय १३), सोमेश पांडुरंग नेवारे (वय १४), वैभव आशिष बोदले (वय १०) व सोम्या सतीश हडसन (वय १०, सर्व रा. दारव्हा) अशी मृत शाळकरी मुलांची नावे आहेत.
जिल्ह्यात वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. दारव्हा रेल्वे स्टेशनलगत या रेल्वे मार्गावर पुलासाठी मोठा खोल खड्डा करण्यात आला आहे. पावसामुळे या खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास त्याच परिसरातील चारही मुले पोहण्यासाठी या खड्ड्यात उतरले. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी घेत चौघांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तत्काळ दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथे हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी चारही मुलांना मृत घोषित केले.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. इतक्या मोठ्या खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था, कुंपण किंवा इशारा फलक न लावल्याने या मुलांना आपला जीव गमवावा लागल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, घटनेचा पुढील तपास ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दारव्हा पोलिस करीत आहेत.