

वणी: वणी-सापुतारा महामार्गावर झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (दि. १५) सकाळी अकराच्या सुमारास अंबानेर फाट्याजवळ हा अपघात घडला. माधुरी मनोज देशमुख (वय २५, रा. वडपाडा, ता. सुरगाणा) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज देशमुख हे त्यांची पत्नी माधुरी यांच्यासह पिंपरखेड येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटून वणीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून परत येत होते. अंबानेर फाट्याजवळ आले असता, पाठीमागून वेगाने आलेल्या दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर मागे बसलेल्या माधुरी देशमुख रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे पती मनोज देशमुख किरकोळ जखमी झाले आहेत.
धडक देणाऱ्या दुचाकीवरील चालक नारायण काशिनाथ रक्ते (वय ४०, रा. नाशिक) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ते पांडाणे येथील एका आश्रमशाळेत शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समजते. अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.