MP Sanjay Deshmukh
उमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय देशमुख यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय जाधव यांची निवड करण्यात आली. सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) यवतमाळ येथील बँकेच्या मुख्यालयात झालेल्या विशेष सभेत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महायुतीप्रणीत बळीराजा सहकार पॅनेलने २५ पैकी १६ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. महाविकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. या निकालानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात उत्सुकता होती.
पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर अध्यक्षपदासाठी खासदार संजय देशमुख यांच्या नावावर एकमत झाले. तसेच महागाव गटातून निवडून आलेले भाजपचे नितीन भुतडा आणि पुसद गटातून विजयी झालेले विजय जाधव यांची उपाध्यक्षपदासाठी निवड करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सोमवारी विशेष सभेत निवडीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली.
या निवडीमुळे यवतमाळ जिल्हा बँकेच्या सत्तेची सूत्रे महायुतीच्या हाती आली आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांसमोर बँकेचा आर्थिक कारभार सक्षम करणे, थकीत कर्जाचे प्रमाण कमी करणे आणि शेतकऱ्यांना वेळेत कर्जपुरवठा उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची आव्हाने असणार आहेत. जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि बँकेच्या सभासदांचे लक्ष आता नव्या संचालक मंडळाच्या कामकाजाकडे लागले आहे.