

प्रशांत भागवत
उमरखेड : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीप्रणीत बळीराजा सहकार पॅनलने बहुमत मिळविले. मात्र, या निवडणुकीच्या निकालातून आणखी एक रंजक बाब पुढे आली आहे. आकाराने छोटा; परंतु राजकीय घडामोडींमध्ये नेहमीच चर्चेत राहणाऱ्या महागाव तालुक्याच्या पार्श्वभूमीचे तब्बल चार संचालक बँकेच्या संचालक मंडळात पोहोचले आहेत.
विशेष म्हणजे, या चारही संचालकांची निवड वेगवेगळ्या राजकीय आणि सहकारी संस्थांच्या वाटांनी झाली असून, त्यामागे स्थानिक राजकारण, सहकारातील प्रतिनिधित्व आणि बदलती राजकीय समीकरणे यांची गुंतागुंत दिसून येते. नितीन भुतडा, महेश राठोड, स्मिता साहेबराव कदम आणि नानाभाऊ गाडबैले या चौघांच्या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात महागाव तालुक्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
भुतडा उमरखेडचे, पण महागावशी सहकाराचे नाते!
महागाव तालुका गटातून नितीन भुतडा यांनी एकतर्फी विजय मिळविला. त्यांची राजकीय ओळख उमरखेडशी जोडलेली असली, तरी महागाव तालुक्यातील शेती आणि सहकाराशीही त्यांचे नाते आहे. मुडाणा येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून ते बँकेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले. त्यामुळे भुतडा यांचा विजय केवळ उमरखेडच्या राजकीय वर्तुळापुरता मर्यादित न राहता महागाव तालुक्यातील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधित्वाशीही जोडला गेला आहे.
राठोडांचा वारसा आता महेश यांच्या खांद्यावर!
महागाव तालुक्याच्या सहकार क्षेत्रात माजी संचालक शिवाजीराव राठोड यांचे नाव परिचित आहे. त्यांनी दोन वेळा जिल्हा बँकेत तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी स्वतः निवडणूक न लढविता पुत्र महेश राठोड यांना पुढे केले. बदलती राजकीय परिस्थिती आणि सहकार क्षेत्रातील कायदेशीर तरतुदींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेली ही भूमिका लक्षवेधी ठरली.
महेश राठोड यांनी जिल्हा गटातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून महायुतीच्या पाठबळावर विजय मिळविला. त्यामुळे शिवाजीराव राठोड यांच्या सहकारातील अनुभवाचा वारसा आता महेश राठोड पुढे नेणार आहेत. ही निवड म्हणजे केवळ एका नव्या चेहऱ्याचा प्रवेश नसून, सहकारातील नेतृत्वाच्या पुढील पिढीकडे झालेल्या संक्रमणाचेही उदाहरण ठरते.
स्मिता कदम यांचे सहकारातील पुनरागमन!
हिवरा येथील रहिवासी असलेल्या स्मिता साहेबराव कदम यांना जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळाले आहे. यापूर्वी त्यांनी बँकेच्या संचालिका म्हणून काम केले असून, जिल्हा परिषदेच्या राजकारणातही त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सहकारी बँकेपर्यंतचा त्यांचा अनुभव महत्त्वाचा मानला जातो. त्यांच्या निवडीमुळे महागाव तालुक्याला जिल्हा बँकेत अनुभवी महिला नेतृत्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे. सहकार क्षेत्रातील त्यांचा पूर्वानुभव आगामी काळात बँकेच्या कामकाजात कितपत उपयोगी ठरतो, याकडेही लक्ष असेल.
यवतमाळचे नव्हे, महागावचे नानाभाऊ गाडबैले!
या चौघांमधील आणखी एक लक्षवेधी नाव म्हणजे नानाभाऊ गाडबैले. त्यांची मूळ पार्श्वभूमी महागाव तालुक्यातील पोहंडूळ गावाची आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात त्यांची उपस्थिती ही महागाव तालुक्याच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते.
भुतडा, राठोड, कदम आणि गाडबैले या चौघांच्या निवडीचे मार्ग वेगवेगळे असले, तरी त्यांची नाळ महागाव तालुक्याशी जोडलेली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या नव्या संचालक मंडळात महागाव तालुक्याचे प्रतिनिधित्व नेमके किती व्यापक आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.
राजकीयदृष्ट्या छोटा तालुका, सहकारात मोठे वजन!
महागाव तालुका राजकीयदृष्ट्या अनेकदा महत्त्वाच्या घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिला आहे. स्थानिक राजकीय समीकरणे, सहकारी संस्थांमधील प्रभाव आणि वेगवेगळ्या गटांतील नेतृत्व यांचा परिणाम जिल्हास्तरीय राजकारणावरही होताना दिसतो. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चार संचालकांच्या रूपाने या तालुक्याची उपस्थिती ठळक झाली आहे.
मात्र, चार संचालक निवडून येणे आणि तालुक्याच्या प्रश्नांना बँकेच्या धोरणात्मक निर्णयांत प्राधान्य मिळणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी संस्था, पीककर्ज वाटप, कर्जवसुली आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर हे प्रतिनिधी कितपत एकत्रित भूमिका घेतात, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरेल. जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात महागाव तालुक्याच्या या चार प्रतिनिधींचा प्रभाव किती राहतो, याचे उत्तर पुढील घडामोडींमधून मिळेल. सध्या मात्र जिल्हा बँकेच्या नव्या संचालक मंडळात महागाव तालुक्याची चौफेर उपस्थिती हा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.