Cattle death Yavatmal
यवतमाळ : नेहमीप्रमाणे धरण परिसरात चराईसाठी गेलेल्या शेकडो जनावरांचा धरणाच्या पाण्यात मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना मंगळवार दि. १० जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील धारकान्हा येथे घडली. यात शेतकरी व पशुपालकांचे मोठे नुकसान झाले.
महागाव तालुक्यातील धारकान्हा येथील जनावरांचा कळप मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे चराईसाठी अधर पुस प्रकल्पाच्या बॅकवॉटर क्षेत्रात गेला होता. चराई झाल्यानंतर ही जनावरे धरणाच्या काठावर कमी असलेल्या पाण्यात बसली होती. याचदरम्यान सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
याचवेळी धरणाच्या पाण्यात शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली. पाण्यात निर्माण झालेल्या लाटांमुळे जनावरांना बाहेर निघणे अवघड झाल्याने गाळात फसुन त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला. या जनावरांमध्ये गाय, म्हैस, बैल, कालवडी आदींचा समावेश आहे.
या घटनेची माहिती मिळताच आ. किसन वानखेडे, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार अभय मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आज बुधवारी पहाटेच त्यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.
नुकसानग्रस्त जनावरांचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश त्यांनी महसूल व पशुवैद्यकीय विभागाला दिले. पशुधन विमा व अन्य शासकीय योजनांमधून शक्य त्या सर्व स्वरूपात मदत देण्याचे आश्वासन दिले. आ. किसन वानखेडे यांनी तहसीलदार मस्के यांना सोबत घेऊन बोटीतून बॅक वॉटर परिसराची पाहणी केली. नेमके किती जनावरे मृत्यूमुखी पडले याचा त्यांनी आढावा घेतला.
मृत्युमुखी पडलेल्या जनावरांपैकी बरीच जनावरे गाळात फसलेली आहे. त्यामुळे वीज कोसळून जनावरांचा मृत्यू झाला की वेगळ्या कारणामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. आज बुधवारी मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करण्यासाठी पशु संवर्धन विभागाला पाचारण करण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या जनावराच्या मृत्यूचे गूढ उकलले जाणार आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ३१ गायी, ६ वासरे, ३ वळू यांना बाहेर काढण्यात आले होते. किती जनावरे मृत्युमुखी पडली, बेपत्ता जनावरे किती याचा तपास उशिरापर्यंत सुरु होता.
नैसर्गिक आपत्तीने धारकान्हा गावात मोठे नुकसान झाले. गोरगरीब, अल्पभूधारक, पशुपालक, शेतकरी कोलमडून पडले. ४० पाळीव जनावरांचे मृतदेह प्रकल्पाच्या पाण्यात तरंगताना पाहून सर्वांच्याच काळजाचे पाणी पाणी झाले. आपद्गस्त शेतकऱ्यांच्या मदतीला गावकरी धावले. सुनील कांबळे, सुरेश मोरे, विजय कांबळे, सिद्धांत इंगळे, गजानन डोंगरे, शिवचरण खरात यांनी परिश्रम घेऊन शेतकऱ्यांना मदत केली. प्रशासकीय अधिकारी, लोक प्रतिनिधींना फोन करून या घटनेची माहिती देण्यात आली, त्यामुळे यंत्रणा तातडीने धारकान्ह्यात पोहचली.