यवतमाळ : बँकेतून पैसे काढून निघालेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या हातातील रोख दोन चोरट्यांनी लांबविली. त्यानंतर दुचाकीने पळ काढला होता. यावेळी सतर्कता दाखवून लुटमारी करणाऱ्यांना लाडखेड परिसरात पोलिस आणि ग्रामस्थांच्या साहाय्याने जेरबंद करण्यात आले. दोन्ही चोरट्यांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हा प्रकार शहरातील स्टेट बँक चौकात गुरुवारी (ता. २६) घडला. प्रवीणकुमार दासू (वय ३४), दास बाबू रड्डा (वय २६) दोघेही रा. बिटरगुंटा, निल्लोर, आंध्र प्रदेश, असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
शहरातील सिद्धेश्वर नगर येथील रहिवासी तथा वाशीम जिल्ह्यातील मानोरा येथील मंडळ अधिकारी अशोक खंडारे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीनुसार मंडळ अधिकारी खंडारे यांनी डोळ्याच्या शस्त्रक्रियेकरिता स्टेट बँकेतून गुरुवारी दुपारी एक लाख रुपये विड्रॉल केले होते.
त्यामधील ४० हजार रुपये एयू बँकेत जमा केले. उर्वरित ६० हजार रुपये घेऊन जात असताना अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांच्याजवळील ६० हजार रुपयांची रोख हिसकावून पळ काढला. ही घटना अवधुतवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी विशाल भगत यांच्या लक्षात आली. त्यांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. दारव्हामार्गे दुचाकीस्वार जात असल्याचे लक्षात येताच लोहारा पोलिस ठाण्यातील कर्मचारी बबलू पठाण याला याबाबतची सूचना दिली
दरम्यान, तातडीने बबलू पठाण याने लोहारा टी पाइंट गाठले. तो पर्यंत लूटमार करणाऱ्या दोघांनीही पळ काढला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून लाडखेड पोलिस ठाण्यातील कर्मचारी नितीन सलाम यांना लुटमारीची माहिती दिली असता, लाडखेड ठाणेदार विनायक लांबे, कर्मचारी नितीन सलाम, अविनाश ढोणे यांनी त्या लुटमारी करणाऱ्या दोघांना पाठलाग केला. दुचाकीने पळ काढत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली असता, त्यांनीसुद्धा पोलिसांना मदत केली. दरम्यान, लुटमारी करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.