यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथील एका १५ वर्षीय बालकाचा खंडापूर शेतशिवारातील तलावात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२०) सायंकाळीच्या सुमारास घडली. पवन हिंमत ढोरे (वय १५) असे मृत बालकाचे नाव आहे.
पवन हा आपल्या आईसोबत खंडापूर शेत-शिवारात ढोरे चारण्यासाठी गेला असताना शिवारातील तलावाच्या काठावरून जात असताना पाय घसरून तो तलावाच्या पाण्यात पडला. आईच्या नजरेसमोरच त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिस आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश भगत, महादेव फलटणकर करीत आहेत.