यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट दस्तावेजाच्या आधारे २४२ कोटींचा अपहार झाला.  Pudhari News Network
यवतमाळ

यवतमाळ : बाबाजी दाते बँकेत २४२ कोटींचा अपहार; २०६ जणांवर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या संचालक मंडळ, मुख्याधिकारी, व्यवस्थापक, ऑडिटर यांनी बनावट दस्तावेजाच्या आधारे २४२ कोटींचा अपहार केला. या प्रकरणात विशेष लेखापरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी पहाटे तब्बल २०६ जणांवर शहरातील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Yavatmal Babaji Date Bank Scam)

बोगस कर्ज प्रकरणे तयार करून रक्कम हडपली

महिलांनी महिलांसाठी चालविलेली बाबाजी दाते महिला सहकारी बँक ही यवतमाळ जिल्ह्यातील पहिली बँक आहे. येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सर्वच महिला होत्या. त्याच विश्वासाने या बँकेत रोजमजुरी करणाऱ्यांनी आपली कष्टाची कमाई ठेवली. सोबतच इतरही छोट्या पतसंस्थांनी त्यांच्या ठेवी या बँकेत ठेवल्या. विश्वासघात करीत बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, ऑडिटर यांनी बोगस कर्ज प्रकरणे तयार करून ठेवीची रक्कम हडपली. यातून बँक डबघाईस आली. सुरुवातीला बँकेचे ७२ हजार सभासद होते. बँकेच्या शाखा, नांदेड, अमरावती, हिंगणघाट, चंद्रपूर या जिल्ह्यातही आहेत. तब्बल २० शाखांमधून या बँकेचा कारभार चालत होता. (Yavatmal Babaji Date Bank Scam)

बँकेचा बँकिंग परवानाही रद्द

अपहार झाल्यानंतर बँक दिवाळखोरीत निघाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचा बँकिंग परवानाही रद्द केला. त्यानंतर सहकार आयुक्त पुणे यांच्या आदेशावरून विशेष लेखापरीक्षकांनी कर्ज प्रकरणाची पडताळणी केली. तब्बल १४२ कर्ज प्रकरणात मोठी अनियमितता आढळून आली. त्यानुसार पडताळणीत १ ते ११ मुद्द्यावरून आरोप ठेवण्यात आले. यामध्ये तब्बल २०६ जणांचा समावेश आहे. यांनी १ एप्रिल २००६ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत विविध व्यवहारातून, कर्ज प्रकरणातून अपहार केल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी कलम ४२०, ४०६, ४०९, ४१७, ४१८, ४२१, ४२४, ४६७, ४६८, ४७१, ४७७ (अ), १२० (ब) यासह महाराष्ट्र ठेवीदार सुरक्षा कायदा १९९९ च्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. (Yavatmal Babaji Date Bank Scam)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT